मेट्रो रेल्वे लाख मोलाची!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

नागपूर - मेट्रो रेल्वे सुरू होण्यापूर्वीच एक लाख चाहते निर्माण झाले आहेत. या चाहत्यांनी महामेट्रोच्या माहिती केंद्राला भेट दिल्याने हा प्रकल्प लाख मोलाचा ठरला. विशेष म्हणजे विदेशी पर्यटकांनीही या माहिती केंद्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

नागपूर - मेट्रो रेल्वे सुरू होण्यापूर्वीच एक लाख चाहते निर्माण झाले आहेत. या चाहत्यांनी महामेट्रोच्या माहिती केंद्राला भेट दिल्याने हा प्रकल्प लाख मोलाचा ठरला. विशेष म्हणजे विदेशी पर्यटकांनीही या माहिती केंद्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

मेट्रो प्रकल्प, स्टेशनचे बांधकाम, आर्किटेक्‍चर, मेट्रोसाठी तयार करण्यात येत असलेले ट्रॅक, त्यासाठी उभारण्यात आलेले पिलर, व्हायाडक्‍ट, मेट्रोचे कोच, त्यातील सुविधांबाबत नागरिकांना माहिती मिळावी, यासाठी महामेट्रोने सुरुवातीला कस्तुरचंद पार्क येथे माहिती केंद्र सुरू केले. मागील मे महिन्यात हे माहिती केंद्र झीरो माइल येथे स्थानांतरित करण्यात आले. या माहिती केंद्रावर दररोज २०० नागरिक भेट देत असल्याचे नमूद करीत २७ फेब्रुवारी २०१७ पासून आतापर्यंत एक लाख चाहत्यांनी भेट दिल्याचा दावा महामेट्रो प्रशासनाने केला आहे. यात पोलिस, शाळकरी विद्यार्थी, शासकीय अधिकारी यांचा समावेश आहे. यापूर्वी नागपूर मेट्रोच्या फेसबुक पेजवर ४ लाख ३५ हजार पेक्षा जास्त लाईक्‍स मिळाल्याने हे पेज संपूर्ण देशातील मेट्रो प्रकल्पांच्या फेसबुक पेजमध्ये प्रथम क्रमांकाचे ठरले होते. त्या पाठोपाठ आता नागपूर मेट्रोच्या माहिती केंद्राने विक्रमी झेप घेतल्याचे महामेट्रोने प्रशासनाने स्पष्ट केले. 

आकर्षणाचे केंद्र
विदेशी नागरिकांनीही या माहिती केंद्राला भेट दिली असून नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. मेट्रोचे कोच, त्यातील सुविधांचा अनुभव येथे तयार केलेल्या मेट्रो कोचच्या प्रतिकृतीतून नागरिक घेत आहेत. माहिती केंद्रातील टीव्ही संचावरून प्रसारित होत असलेल्या मेट्रो प्रकल्पाविषयी माहितीमुळे नागरिकांना हा प्रकल्प समजून घेता येत आहे.

Web Title: metro railway student coach