महापालिका निवडणुकीपूर्वी धावणार मेट्रो

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

नागपूर - मार्च महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीपूर्वी मेट्रो धावेल असे कुणाला सांगितले, तर विश्‍वास बसणार नाही. मात्र, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरची पहिली मेट्रो डिसेंबर महिन्यात धावेल, अशी घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला.

नागपूर - मार्च महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीपूर्वी मेट्रो धावेल असे कुणाला सांगितले, तर विश्‍वास बसणार नाही. मात्र, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरची पहिली मेट्रो डिसेंबर महिन्यात धावेल, अशी घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला.

भाजपच्या नागपूर महानगर महिला आघाडी कार्यकारिणीची घोषणा करण्यासाठी रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती मंदिर येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी गडकरी यांनी उपरोक्त घोषणा केली. यावेळी महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा नंदा जिचकार, प्रदेश महासचिव अर्जना डेहनकर, प्रदेश सचिव माया इवनाते, कल्पना पांडे, शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मिलिंद माने, संदीप जोशी, संदीप जाधव आदी उपस्थित होते.

भाजपच्या काळात शहराचा विकास झपाट्याने होत आहे. हजारो कोटींची कामे सुरू आहेत. मेट्रो रेल्वे प्रकल्पावर नऊ हजार कोटींचा खर्च येणार आहे. देशातील सर्वांत वेगाने काम पूर्ण होणाऱ्या प्रकल्पात नागपूरच्या मेट्रो रेल्वेचा समावेश आहे. महापालिकेची निवडणूक मार्च महिन्यात होणार आहे. जानेवारी महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्‍यता आहे. त्यापूर्वीच डिसेंबर महिन्यात मेट्रो रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. मेट्रो रेल्वेचा हिंगणा, बुटीबोरी, कन्हानपर्यंत विस्तार करण्याचा मानस असल्याचे गडकरी म्हणाले.

लातूरमध्ये 10 दिवसांनंतर एकदा पिण्याचे पाणी मिळते. नागपुरात मात्र रोज पाणी मिळते. लोखंडी जलवाहिनीतून पाणी आणल्या जात असल्याने 80 एमएलडी पाण्याची बचत होत आहे. देशात नागपूर आता विकास मॉडेल होत आहे. ही कामे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा. महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता यावी यासाठी सर्व प्रयत्न पणाला लावण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.

Web Title: Metro will run for municipal elections