मेट्रोच्या खोदकामाने भूमिगत वाहिन्‍या क्षतिग्रस्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

नागपूर - मेट्रोच्या खोदकामात मेयो रुग्णालयासह मध्य नागपुरातील वसाहतींना वीजपुरवठा करणाऱ्या दोन भूमिगत वाहिन्या क्षतिग्रस्त झाल्या. यामुळे शनिवारी दुपारी १२ ते रात्री ९ पर्यंत २३ हजार घरांचा वीजपुरवठा खंडित होता. 

नागपूर - मेट्रोच्या खोदकामात मेयो रुग्णालयासह मध्य नागपुरातील वसाहतींना वीजपुरवठा करणाऱ्या दोन भूमिगत वाहिन्या क्षतिग्रस्त झाल्या. यामुळे शनिवारी दुपारी १२ ते रात्री ९ पर्यंत २३ हजार घरांचा वीजपुरवठा खंडित होता. 

मध्य नागपूरला प्रामुख्याने उप्पलवाडी येथून वीजपुरवठा होतो. मेयो रुग्णालयासह परिसरात उप्पलवाडी-मेयो फिडरने वीजपुरवठा करण्यात येतो. शिवाय मेयो-आंबेडकर इंटरलिंक फिडर हा पर्यायी स्त्रोत आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता मेट्रोच्या कंत्राटदाराकडून इंदोरा चौकात खोदकाम सुरू असताना इंटरलिंक फिडर क्षतिग्रस्त झाले. याबाबत कळताच एसएनडीएलने केबल बदलून देण्याची सूचना केली. परंतु, मेट्रो व्यवस्थापनाने दखल घेतली नाही.

शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ऑटोमोटीव्ह चौकानजिक गोत्रा लॉन परिसरात खोदकाम करीत असताना मेयो-उप्पलवाडी ही मुख्य वाहिनी क्षतिग्रस्त झाली. एसएनडीएलच्या पथकाने केबलची जुळवाजुळव करीत जोडणी केल्याने काही तासांमध्ये मेयो रुग्णालयाचा वीजपुरवठा सुरळीत झाला. ‘नो-गो’नंतरही खोदकाम पर्यायी व्यवस्था क्षतिग्रस्त असतानाही मेट्रोकडून पुढे खोदकामाचा आग्रह धरला होता. त्याला एसएनडीएलने विरोध दर्शवित ‘नो-गो’ (पुढे खोदकाम करू नये) दिला होता. यानंतरही शनिवारी खोदकाम सुरू करण्यात आले.

मेट्रोकडे नुकसनभरपाईचे ७६ लाख थकित
खोदकामामुळे होणारे होणारे नुकसान भरून देण्यासाठी एसएनडीएलने विविध यंत्रणांना डिमांड पाठविले आहे. एकट्या मेट्रोकडे ७६ लाखांची नुकसान भरपाई थकित असल्याची माहिती एसएनडीएलने दिली आहे.

विजेच्या धक्‍क्‍याने मजूर गंभीर
टेकानाका  परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. खासगी कंत्राटदाराकडून ही कामे करवून घेतली जात आहेत. कामाच्या ठिकाणाहून हायटेन्शन वाहिनी गेली असून, सेपरेशनसाठी चार खांब आहेत. एसएनडीएलची कोणतीही परवानगी न घेता वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे सुनील लांडगे (२५, रा. दिघोरी) शनिवारी सकाळी खांबावर चढला. मात्र, विजेचा जबर धक्का बसून तो खाली कोसळला. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. धावपळ करीत सुनीलला मेयो रुग्णालयात दाखल केले. तो १६ टक्के भाजला आहे. 

मेयोत रुग्ण, नातेवाइकांचे हाल 
इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) शनिवारी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सीटी स्कॅन, एक्‍स-रेची गरज असलेल्या रुग्णांना प्रतीक्षा करावी लागली. सेंट्रल ॲव्हेन्यूवरील मेट्रोच्या कामामुळे पुरवठा दोन वेळा खंडित झाला.

शनिवारी सकाळी ८ वाजता बाह्यरुग्ण विभाग सुरू झाल्यानंतर तासभरात वीजपुरवठा खंडित झाला. दहा ते पंधरा मिनिटांत पुरवठा सुरू होईल, असे सांगण्यात आले. मात्र, दोन तासांनी वीज आली. 

काही वेळ लोटत नाही तोच पुन्हा पुरवठा खंडित झाला. साडेअकरापासून मेयोतील रुग्णसेवा विस्कळीत झाली. 

टेलिफोन एक्‍स्चेंज चौकात मेयोच्या वीजवाहिनीत बिघाड निर्माण झाल्याने पुरवठा खंडित झाला. सकाळी विजेचा लपंडाव सुरू होता. अकरानंतर पुरवठा पूर्णपणे खंडित झाला.

लिफ्ट बंद
वीज नसल्याने मेयोतील एकही लिफ्ट सुरू नव्हती.
 त्यामुळे रुग्णांना पायऱ्यांवरून नेताना नातेवाइकांचे हाल झाले. मेयोतील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे तीन तासांनंतर पुरवठा सुरळीत झाला.

रक्त चाचण्या थांबल्या
पुरवठा खंडित झाल्यानंतर सीटी स्कॅनसह एक्‍स-रे कक्षात प्रचंड गर्दी झाली. वॉर्डही अंधारात होते. विशेष असे की, पावसाने दडी मारल्यामुळे रुग्णांना उकाडा सहन करावा लागला. रक्ताच्या चाचण्यांही खोळंबल्या. जनरेटरच्या मदतीने अतिदक्षता विभाग आणि शल्यक्रियागृहाचा पुरवठा सुरळीत होता. मात्र, तेथेही दाब कमी अधिक होत असल्यामुळे भीती व्यक्त करण्यात येत होती.

Web Title: metro work digging electricity line cutting