साडेचार वर्षांत दीड लाख रुग्णसंख्या वाढली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

नागपूर, ता. 8 ः सात ते आठ वर्षांपूर्वी आमदारांच्या अंदाज समितीने "मेयो म्हणजे कत्तलखाना' अशा शब्दात विडंबना केली होती. मात्र, गरिबांना खासगीतील उपचार परवडणारे नसल्यामुळे इंदिरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) उपचाराशिवाय पर्याय नाही. तरीदेखील दर दिवसाला गरीब रुग्णांची रुग्णसंख्या वाढत आहे. 2013-14 च्या तुलनेत दीड लाखाने बाह्यरुग्णांची संख्या वाढली असल्याची माहिती पुढे आली आहे.
सामान्य तसेच दारिद्य्ररेषेखालील रुग्णांसाठी मेयो आधार आहे. खासगी रुग्णालयात उपचारासाठी लाखो रुपये उकळले जातात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेयोसह इतरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाच उंबरठा ओलांडतात. प्रशासनाकडून मात्र रुग्णसेवा सुधारण्यासाठी प्रयत्न न करता आपल्याच तोऱ्यात वागताना दिसतात. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2013 दरम्यान बाह्यरुग्णांची संख्या 5 लाख 8 हजार 878 होती. आंतररुग्णांची संख्या 31 हजार 3 होती. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2014 मध्ये बाह्यरुग्णांची संख्या 5 लाख 73 हजार 947 होती. आंतररुग्णांची संख्या 32 हजार 200 होती. त्यानंतर दरवर्षी बाह्यरुग्ण विभागात रुग्णसंख्येची संख्या लाखाने वाढत आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2015 मध्ये बाह्यरुग्णांची संख्या 6 लाख 38 हजार 151 होती. आंतर रुग्णांची संख्या 30 हजार 38 तर होती. यानंतर 2016 मध्ये 6 लाख 81 हजार 424 बाह्यरुग्णांची नोंद झाली. तर आंतररुग्णांची संख्या 35 हजार 285 होती. 2017 साली 6 लाख 98 हजार 801 बाह्यरुग्णांची नोंद झाली. सात लाखांच्या जवळ बाह्यरुग्णांची संख्या गेली आहे. तर 37 हजार 931 आंतररुग्ण भरती होते. याशिवाय 2018 मध्ये 6 लाख 63 हजार 805 बाह्यरुग्णांची नोंद झाली. तर आंतररुग्णांचाही टक्का वाढला. 41 हजार 525 रुग्ण भरती झाले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meyo