मायक्रोमॅक्‍सला ग्राहक मंचाचा दणका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

नागपूर - मोबाईल उपभोक्‍त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे मायक्रोमॅक्‍स कंपनीला महागात पडले. याबाबत उपभोक्‍त्याने ग्राहक मंचमध्ये दाखल केलेल्या तक्रारीवरून मायक्रोमॅक्‍स कंपनीला 15 हजार 600 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 

नागपूर - मोबाईल उपभोक्‍त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे मायक्रोमॅक्‍स कंपनीला महागात पडले. याबाबत उपभोक्‍त्याने ग्राहक मंचमध्ये दाखल केलेल्या तक्रारीवरून मायक्रोमॅक्‍स कंपनीला 15 हजार 600 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 

तक्रारकर्तीचे नाव प्रीती रमेश दिग्रसे (रा. भगवाननगर) आहे. त्यांनी 6 नोव्हेंबर 2014 रोजी भुतडा मोबाईल गॅलरीमधून मायक्रोमॅक्‍स कंपनीचा मोबाईल विकत घेतला. काही दिवसांनंतर मोबाईलमध्ये बिघाड निर्माण झाल्याने त्यांनी उंटखाना मार्गावरील मोबाईल एक्‍स्पर्ट येथे दुरुस्तीला दिला. मोबाईल एक्‍स्पर्ट या सर्व्हिस सेंटरने मोबाईल ठेवून घेतला आणि 8 ते 10 दिवसांनी बोलावले. यानुसार दिग्रसे 10 दिवसांनंतर सर्व्हिस सेंटरला गेल्या असता मोबाईल एकदम नवीन झाला असून आता काहीही समस्या येणार नाही, असे सांगण्यात आले. मात्र, दोन दिवसांनंतर मोबाईलमध्ये पुन्हा समस्या निर्माण झाली. यामुळे तक्रारकर्तीने दुकानदाराशी संपर्क साधला. परंतु त्यांनी लक्ष दिले नाही. यामुळे तक्रारकर्तीने 17 डिसेंबर 2015 रोजी मायक्रोमॅक्‍स कंपनी आणि भुतडा मोबाईल गॅलरीला वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावली. नोटीस मिळूनही उत्तर न दिल्याने ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल केली. 

ग्राहक मंचने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेत तक्रारकर्तीची तक्रार अंशत: मंजूर केली. यानुसार मायक्रोमॅक्‍स, भुतडा मोबाईल गॅलरी आणि मोबाईल एक्‍स्पर्ट यांना वैयक्तिक अथवा संयुक्तरीत्या मोबाईलची किंमत 8 हजार 100 रुपये, तक्रारकर्तीला दिलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी 5 हजार रुपये व तक्रारीचा खर्च 2 हजार रुपये अदा करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आदेशाची प्रत मिळताच 30 दिवसांच्या आत अंमलबजावणी करण्याचे ग्राहक मंचने आपल्या आदेशात म्हटले आहे. 

Web Title: Micromax Consumer Forum bump