संतप्त नातेवाइकांकडून मिडासमध्ये तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

नागपूर - रामदासपेठेतील मिडास मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे अठरा वर्षीय तुषार हसोरिया (टिमकी) या युवकाचा मृत्यू झाला, असा असा आरोप करीत संतप्त नातेवाइकांनी मंगळवारी येथील खिडक्‍यांच्या काचा, खुर्च्या तसेच फायर बॉक्‍सची तोडफोड केली. कर्मचाऱ्यांना धमकावत धक्काबुक्की केली. पोलिसांचा ताफा वेळेवर पोचल्याने परिस्थिती आटोक्‍यात आली.   

नागपूर - रामदासपेठेतील मिडास मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे अठरा वर्षीय तुषार हसोरिया (टिमकी) या युवकाचा मृत्यू झाला, असा असा आरोप करीत संतप्त नातेवाइकांनी मंगळवारी येथील खिडक्‍यांच्या काचा, खुर्च्या तसेच फायर बॉक्‍सची तोडफोड केली. कर्मचाऱ्यांना धमकावत धक्काबुक्की केली. पोलिसांचा ताफा वेळेवर पोचल्याने परिस्थिती आटोक्‍यात आली.   

तुषारने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. अचानक प्रकृती बिघडल्याने ४ एप्रिलला मिडास मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय निदानात यकृतामध्ये संसर्ग झाला असून, ते १० ते २० टक्के काम करीत होते. यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला नातेवाइकांना दिला होता. तुषारला लवकर थकवा येत होता. श्‍वास घेताना धापा लागत होत्या. यामुळे पहिल्याच दिवशीच अतिदक्षता विभागात कृत्रिम ऑक्‍सिजन लावण्यात आले. ९ एप्रिलला श्‍वास घेण्यास अधिक त्रास झाल्याने डॉक्‍टरांनी लहान व्हेंटिलेटरवर तर रात्री मोठे व्हेंटिलेटर लावले. मंगळवारी (ता. १०) सकाळी तुषारचा मृत्यू झाला. नातेवाइकांना रुग्ण दगावल्याचे सांगितल्यानंतर पुन्हा साडेआठच्या सुमारास डॉक्‍टर ईसीजी काढत असल्याचे दिसून आले. यामुळे नातेवाइकांना संशय आला. डॉक्‍टरांनी रुग्णाला सकाळी ८.५८ मिनिटांना मृत घोषित केले. एक दिवसापूर्वी तुषारने सर्वांशी संवाद साधला होता. डॉक्‍टरांनी औषधांचा ओव्हरडोज दिल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काही वेळाने नातेवाईक शांत झाले. परंतु, ११ वाजताच्या सुमारास सुमारे दीडशेवर नातेवाईक पुन्हा परत आले. त्यांनी रुग्णालयातील खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली. फायर बॉक्‍स तोडला. काचा फोडल्या.

परिचारिकासह सुरक्षारक्षकांना मारहाण  केली. डॉ. श्रीकांत मुक्केवार पाचव्या माळ्यावर होते. ही माहिती मिळताच नातेवाइकांचा जमाव पाचव्या माळ्यावर गेला.

नातेवाईक-डॉक्‍टर आमनेसामने
एका बाजूला संतप्त दीडशे नातेवाईक तर दुसऱ्या बाजूला पन्नास डॉक्‍टर असे चित्र होते. शाब्दिक चकमकीतून तणाव वाढत गेला. पोलिसांचा ताफा वेळेवर पोचल्याने दुर्घटना टळली.  नातेवाइकांनी परतताना इमारतीच्या तळमाळ्यावरील काचा फोडल्या. शेवटी मृतदेह शवविचछेदनासाठी मेडिकल रुग्णालयात पाठवण्यात आला. 

रुग्ण अत्यवस्थ होता. नातेवाइकांना याची वेळोवेळी माहिती दिली होती. व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखविले होते. योग्य उपचार झाले; पण औषधांना प्रतिसाद मिळत नव्हता. हळूहळू एक-एक अवयव निकामी होऊन तो दगावला. तरुण मुलगा दगावला. मनाला चटका लावणारी घटना आहे. रुग्णाचे पस्तीस हजार रुपयांचे बिल माफ केले. परंतु, त्यानंतरही नातेवाइकांनी तोडफोड केली. कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यामुळे पोलिसांत तक्रार केली.  
- डॉ. श्रीकांत मुक्केवार, मिडास मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर

Web Title: midas multispeciality hospital damage crime