सोनेगावात व्यावसायिकाची आत्महत्या

सोनेगाव ः मृतदेहाचा पंचनामा करताना पोलिस कर्मचारी.
सोनेगाव ः मृतदेहाचा पंचनामा करताना पोलिस कर्मचारी.

वाडी (जि.नागपूर):  एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या दुग्ध व्यावसायिकाचा मृतदेह सोनेगावजवळील जंगलात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
प्राप्त माहितीनुसार, सोनेगाव येथील रहिवासी शेखर बिटने (वय 31) हे पत्नी व आठ महिन्यांच्या मुलीसह परिसरात वास्तव्य करीत होते. घरी काही दुधाळ जनावरे पाळून दुधाचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. परंतु मागील वर्षीपासून येथील संदीप मेटलच्या दूषित पाण्यामुळे शेखरची बरीच जनावरे दगावल्याने व इतरांचे कर्ज वाढल्याने ते आर्थिक विवंचनेत अडकले होते. याच कारणावरून मागील महिन्यात ते घरून निघून गेले. कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा सगळीकडे शोध घेतला; परंतु त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. मंगळवारी सकाळच्या सुमारास काही गुराखी जनावरे चारायला सोनेगावनजीकच्या जंगलात गेले असता त्यांना सापळा आढळून आला. त्यांनी ही घटना ग्रा. पं. सदस्य विनोद लंगोटे यांना सांगितली. त्यांनी मृताची ओळख पटवली. घटनेची माहिती वाडी पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला व उत्तरीय तपासणीकरिता मृतदेह मेयो रुग्णालयात पाठविला. सध्या वाडी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.


दहा वर्षांपूवी वडिलांचीही आत्महत्या
दहा वर्षांपूर्वी शेखरच्या वडिलांनी त्यांच्या मूळ गावी वर्धा जिल्ह्यात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. घरी दीड एकर शेती असल्याने मोठा प्रपंच चालविणे कठीण होते. त्यामुळे शेखर पत्नीला घेऊन सोनेगाव येथे वास्तव्यास आले. येथे त्यांनी काही जनावरे विकत घेऊन दुधाचा व्यवसाय सुरू केला. घराचा कमावता पुरुष गेल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com