दूध भुकटीच्या निर्यातीला 50 रुपये अनुदान देणार - जानकर

ज्ञानेश्‍वर बिजले
बुधवार, 11 जुलै 2018

नागपूर - दूध भुकटी उत्पादकांनी दूध भुकटीची निर्यात केल्यास त्या भुकटीसाठी प्रतिकिलो 50 रुपये, तसेच दुधाची निर्यात करणाऱ्या दूध प्रकल्पांना निर्यात केलेल्या दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये एवढे प्रोत्साहन अनुदान पुढील दोन महिन्यांकरिता देण्यात येईल, असे दुग्धव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले. दूध प्रश्‍नांवरून विधानसभेत काल लक्षवेधी सूचना राखून ठेवण्यात आली होती.

शालेय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध पोषण आहार योजनांमध्ये दूध व दूध भुकटीचा समावेश करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. दुधाच्या उपपदार्थांना अधिक मागणी येण्याच्या दृष्टीने तूप, लोणी यावरील जीएसटी कमी करण्यात यावी, अशी शिफारस केंद्र सरकारला करण्यात येईल, असे जानकर यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दुधासाठी लिटरमागे 17 ते 21 रुपये मिळत असल्याची तक्रार काल आमदारांनी केली होती, त्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे काल विधानसभेत जाहीर करण्यात आले होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते. त्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर हे निर्णय घेण्यात आल्याचे जानकर यांनी सांगितले.

Web Title: milk powder export 50 rupees subsidy mahadev jankar