उदासीनतेचा दूध उत्पादकांना फटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

भंडारा : दुधाचे भाव कोसळ्यामुळे शासनाने प्रतिलिटर अनुदानाची योजना चालवली होती. परंतु, सहकारी संघ व खासगी संस्थांनी त्याबाबत दाखविलेल्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक अनुदान योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. तसेच या योजनेत जाचक अटींमुळे सहभाग घेता आला नाही, असे सांगण्यात येत आहे.

भंडारा : दुधाचे भाव कोसळ्यामुळे शासनाने प्रतिलिटर अनुदानाची योजना चालवली होती. परंतु, सहकारी संघ व खासगी संस्थांनी त्याबाबत दाखविलेल्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक अनुदान योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. तसेच या योजनेत जाचक अटींमुळे सहभाग घेता आला नाही, असे सांगण्यात येत आहे.
विदर्भात सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या भंडारा जिल्ह्यात साडेचार लाख लिटर दूध उत्पादन होते. यापैकी प्रतिदिन सरासरी दोन लाख 70 हजार लिटर दुधाचे संकलन सहकारी संघ व खासगी डेअरीमार्फत केले जाते. येथील दुधाचा दर्जा चांगला असल्याने खासगी डेअरींनी अनेक ठिकाणी संकलन केंद्र निर्माण केले आहेत. जिल्ह्यात 282 सहकारी संस्थांचे 14 हजार 100 सभासद आहेत. याशिवाय सुमारे 20 हजारांवर पशुपालक खासगी संस्थांना दुधाची विक्री करतात.
गेल्या वर्षी राज्यात दुधाचे भाव कोसळल्याने शासनाद्वारे गायीच्या दुधावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची योजना राबवली होती. या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्हा दूध विकास अधिकाऱ्यांनी जिल्हा सहकारी संघ आणि खासगी दूध संकलन करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या अनेक बैठकी घेऊन माहिती दिली. परंतु, योजनेच्या निकषांप्रमाणे कोणत्याही संस्थेने योजनेत सहभाग घेतला नाही. त्यामुळे ऑक्‍टोबर 2018 पासून सहा महिन्यांपर्यंत दूध उत्पादक प्रतिलिटर पाच रुपये प्रमाणे शासकीय अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांचे अंदाजे 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
जाचक अटींमुळे सहभाग नाही
शासनाद्वारे जाहीर केलेल्या योजनेनुसार दुधाचा भाव 20 रुपये असताना प्रक्रिया करून पावडर निर्यात करण्यासाठी पाच रुपये अनुदान मिळणार होते. परंतु, देशाबाहेर दूध पावडर निर्यात करण्याचा परवाना संघाकडे नाही. त्यामुळे आम्ही योजनेत सहभाग घेऊ शकलो नाही. तसेच बाहेर जिल्ह्यात होणारा पुरवठा, अधिक फॅट असलेल्या म्हशीच्या दुधावर अनुदान मिळणार नव्हते.
कार्यालयात कर्मचाऱ्यांची चणचण
जिल्हा दूध विकास व्यवसाय अधिकारी कार्यालयाचे शीतकरण केंद्र 2009 पासून बंद झाले आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यासाठी असलेल्या या कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांची 12 पदे मंजूर असताना त्यातील सात पदे रिक्त आहेत.

भंडारा जिल्ह्यातील दूध हाताळणीची क्षमता दरदिवस पाच लाख 12 हजार लिटर आहे. त्यामुळे मार्केटींगसाठी वेगळी व्यवस्था करण्याची गरज नाही. या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना जोडधंदा मिळाला आहे. शासनाने जाहीर केलेल्या योजनेत सहकारी संघ आणि खासगी व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला असता तर, दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान मिळाले असते.
-प्रदीप पातरे

दूध विकास कार्यालय, भंडारा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milk producers in the depression