खासगी बसच्या धडकेत दूध विक्रेत्याचा मृत्यू

कोंढाळी ः खासगी बसने दिलेल्या धडकेत चक्‍काचूर झालेली दुचाकी.
कोंढाळी ः खासगी बसने दिलेल्या धडकेत चक्‍काचूर झालेली दुचाकी.

कोंढाळी (जि.नागपूर) :  कोंढाळी-नागपूर मार्गावरील चमेली शिवारात दूध घेऊन विक्रीकरिता जात असलेल्या दुचाकीला पुणे येथून नागपूरकडे भरधाव येत असलेल्या खासगी बसने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चमेली येथील संतप्त नागरिकांनी खासगी बसचालकाला जबर मारहाण केली. त्यात बसचालक गंभीर जखमी झाला. बसची तोडफोड केल्यानंतर कोंढाळी-नागपूर मार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक दोन तास रोखून धरण्यात आली. वाहतूक ठप्प झाल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 
कोंढाळी-नागपूर महामार्गावर कोंढाळीपासून 3 किलोमीटर अंतरावरील चमेली येथील प्रभाकर नामदेव सोनवने (वय 45) हे नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी घरून दूध घेऊन दुचाकीने विक्रीकरिता ढाब्यांवर जात होते. गावासमोर पुणे येथून 30 प्रवासी घेऊन नागपूरकडे भरधाव येत असलेल्या खासगी बसने शनिवारी सकाळी 8.15 वाजता एका ट्रकला "ओव्हरटेक' करण्याच्या प्रयत्नात मार्गाच्या बाजूने जात असलेल्या प्रभाकर सोनवने यांच्या दुचाकीला चिरडले. अख्खी दुचाकी बसखाली आली व प्रभाकरचे मुंडके धडापासून वेगळे झाले. चमेली गावालगतच हा अपघात झाल्याने गावातील लोक धावत घटनास्थळी आले. चमेली येथील संतप्त जमावाने खासगी बसचालक फिरोज दस्तगिर बागवान (वय 44, येडसी, जिल्हा उस्मानाबाद) याला लाथाबुक्‍क्‍यांनी जबर मारहाण केली. मारहाणीत बसचालक गंभीर जखमी झाला. महामार्गावर दुचाकी आडव्या करून कोंढाळी-नागपूर मार्गावरील वाहतूक ठप्प केली. लाठ्या-काठ्‌यांनी बसची तोडफोड केली. बसमधील 30 प्रवासी मिळेल त्या वाहनाने नागपूरकडे रवाना झाले. कोंढाळी पोलिसांना वारंवार फोन करूनही जवळपास एक तास कोंढाळी पोलिस घटनास्थळी पोहोचले नाही. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला 10 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या. कोंढाळीचे ठाणेदार श्‍याम गव्हाने घटनास्थळी आले. त्यांनी जमावाला शांत करुन प्रभाकरचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता रवाना केला. 
कंटेनरच्या धडकेत वृद्ध ठार 
धामणा (लिंगा) ः अमरावती ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.सहावरील 14 मैल येथे रस्ता ओलांडत असताना कळमेश्वरवरून नागपूरकडे जात असलेल्या कंटेनरच्या मागच्या चाकात आल्याने वृद्ध जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडलील. मृताचे नाव बापूराव बाळकृष्ण मोहोड गुरुजी (वय 80, धामणा लिंगा) असे आहे. अपघातानंतर काही काळाकरीता वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळी खुर्सापार येथील वाहतूक पोलिस पीएसआय दीपक कॉंक्रीटवार, प्रभाकर लोखंडे, बाळू मोरे, संजय मिश्रा घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली. अपघातानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com