नोटाबंदीचे नव्हे, त्र्यंबकेश्‍वरच्या बडव्यांवर छाप्याचे स्वागत 

मुशीरखान कोटकर - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

सिंदेखडराजा - "मोदी सरकारने एका रात्रीत नोटाबंदी केल्याचा नव्हे, तर नोटाबंदीनंतर त्र्यंबकेश्‍वर येथील बडव्यांच्या घरावर आयकर विभागामार्फत छापे टाकले. या साहसाबाबत मोदी सरकारचे स्वागत आहे,' असे वक्तव्य शिवधर्माचे संस्थापक डॉ. पुरुषोत्तम खेडेकर यांनी आज (ता. 12) जिजाऊसृष्टीवर लाखो समाजबांधवांसमोर केले. 

सिंदेखडराजा - "मोदी सरकारने एका रात्रीत नोटाबंदी केल्याचा नव्हे, तर नोटाबंदीनंतर त्र्यंबकेश्‍वर येथील बडव्यांच्या घरावर आयकर विभागामार्फत छापे टाकले. या साहसाबाबत मोदी सरकारचे स्वागत आहे,' असे वक्तव्य शिवधर्माचे संस्थापक डॉ. पुरुषोत्तम खेडेकर यांनी आज (ता. 12) जिजाऊसृष्टीवर लाखो समाजबांधवांसमोर केले. 

महाराष्ट्रासह, हरियाना, उत्तर प्रदेश अशा विविध प्रदेशांतून राष्ट्रमाता जिजाऊंना वंदन करण्यासाठी लाखो मराठा समाजबांधव जिजाऊसृष्टीवर एकवटले होते. दुपारनंतर शिवधर्मपीठावर मराठा सेवासंघाच्या धर्म संसदेतील प्रमुख नेत्यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर विचारपीठावर छत्रपती राजे संभाजी भोसले, देवानंद कापसे, चंद्रशेखर शिखरे, प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, नेताजी गोरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, जिजाऊ ब्रिगेडच्या छाया महाले, रेखाताई खेडेकर, विजयाताई कोकाटे, मंदाताई किमये, हरियाना येथील सुरजित दाभाडे, दिलीपराव देशमुख, पप्पू भोयर, श्री. तनपुरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या वेळी पुणे येथील राम गणेश गडकरींचा पुतळा काढून नदीत टाकण्याच्या कृतीस समर्थन देत मराठा सेवा संघाच्या वतीने पुतळा काढणाऱ्या युवकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित लाखोंच्या जनसमुदायाने टाळ्यांचा गजर करीत त्या युवकांचे अभिनंदन केले. 

शिवश्री खेडेकर म्हणाले, मराठा समाजाने जागीरदार, पाटील, देशमुख या पदव्यांचे भूषण टाळणे गरजेचे आहे. आता आपण स्वत:ला बदलले पाहिजे. आपल्याकडे बघताना इतर समाजाला चीड निर्माण होत असेल, तर विचार करण्याची गरज आहे. ऍट्रॉसिटीबद्दल बोलताना ते म्हणाले, या कायद्याचा दुरुपयोग होत आहे. या दृष्टीने विचारवंतांनी आमच्या मागणीकडे गांभीर्याने विचार करावा, "दंगल' चित्रपटाबाबत बोलताना त्यांनी मराठा समाजातील महिलांना उद्देशून आपल्या मुलींना स्वाभिमानी बनविण्याचे आवाहन केले. महिलांनी गुलामगिरीतून बाहेर यावे. बुवाबाजी, भटजीसह स्वत:च्या नवऱ्याचेही चरणस्पर्श करू नये. जिजाऊंसारखे तेज आपल्यात निर्माण करावे. यापुढे शिवाजी महाराजांचे पुतळे बसवू नका, तालुका, जिल्हा व गावागावांत खासगी वसतिगृह निर्माण करून गरीब मराठ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करावी. मराठा समाजाचे नेते म्हणवणाऱ्यांनी समाजासाठी काय केले, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. 

खासदार संभाजी राजे यांनी विचार व्यक्त करताना मी मराठा समाजाचा पाईक असून, बहुजनांच्या समस्या, त्यांचे विचार राज्यसभेत पोहोचविण्याचे काम करतो. मराठा क्रांती मोर्चात मराठा कार्यकर्ता म्हणूनच उपस्थित राहिलो. यापुढे जातीजातींमधील विषमता थांबविण्यासाठी लोकजागृती करणार असल्याचे सांगितले. कोपर्डीतील घटनेनंतर समाजात निर्माण झालेला आक्रोश संसदेत मांडला. याचबरोबर मराठा आरक्षणासंदर्भात दोन्ही हातात डिजिटल बॅनर हातात घेऊन लक्षवेधी केली. स्मारक स्वाभिमानाचे प्रतीक आहे. ते कधी पूर्ण होईल याबाबत ठामपणे सांगू शकत नसलो, तरी गड किल्ल्याचे संवर्धन माझ्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. जिजाऊसृष्टीच्या विकासासाठी खासदारनिधीतून जास्तीत जास्त निधी देण्याचे आश्‍वासनही त्यांनी या वेळी दिले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या छायाताई महाले, सुदर्शन तारक, संभाजी ब्रिगेडचे आखरे, सचिन चौधरी, देवानंद कापसे, मधुकर मेहेर आदी मान्यवरांनी आपली भूमिका विशद केली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शिवानंद भानुसे यांनी केले. 

शिवस्मारकाबाबत शंका 
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. मात्र, शिवस्मारक पूर्ण होईल का, अशी शंका मराठा सेवा संघाचे सुप्रिमो ऍड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी जिजाऊसृष्टीवरून बोलताना व्यक्त केली. शिवस्मारक अरबी समुद्राऐवजी जमिनीवर साकारावे, अशी मागणी करून हे शिवस्मारक राजभवनात साकारावे. शिवस्मारक समितीत मराठा सेवा संघाचे संचालक घ्यावे, अशी मागणी मराठा सेवा संघाकडून करण्यात आली आहे. 

Web Title: Millions of people on jijausrsti