लॉकडाउनमुळे लाखो रोपे नर्सरीतच, वाचा काय झाला प्रकार 

मनोज रायपुरे
बुधवार, 1 जुलै 2020

यंदा लॉकडाउनमुळे वृक्षलागवड मोहिमेला ब्रेक लागला आहे. जिल्ह्यातील वनविभागाच्या नर्सरींमध्ये जवळपास 11 लाख रोपे तयार आहेत. एका विशिष्ट कालावधीत रोपांची लागवड न केल्यास ती कोमेजतील.

वर्धा  : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी शासन गत काही वर्षांपासून राज्यात वृक्षलागवड मोहीम राबवीत आहे. दरवर्षी करोडो वृक्षांची लागवड केली जाते, पण यंदा लॉकडाउनमुळे वृक्षलागवड मोहिमेला ब्रेक लागला आहे. जिल्ह्यातील वनविभागाच्या नर्सरींमध्ये जवळपास 11 लाख रोपे तयार आहेत. एका विशिष्ट कालावधीत रोपांची लागवड न केल्यास ती कोमेजतील. यात लाखो रुपये व्यर्थ जाणार आहेत, असे बोलले जात आहे. यंदा सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालयांतून रोपांची मागणीच झाली नाही. त्यामुळे नर्सरीमध्ये रोपे तशीच आहे. 

मागील वर्षी जिल्ह्यात 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत 76 लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. यंदा वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजनेद्वारे शासन वृक्षलागवड मोहीम राबविणार होते. वृक्षलागवड मोहिमेत रोपांची कमतरता जाऊ नये, यासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्‍यांतील रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करण्यास सुरुवात केली होती. वनविभागाच्या 12 नर्सरींमध्ये विविध प्रजातींचे रोपे तयार करण्यात आली आहे.

या नर्सरींमध्ये 18 महिन्यांची 3 लाख 55 हजार तर नऊ महिन्यांची 7 लाख 50 हजार रोपे तयार आहेत. 
कोरोना महामारीमुळे राज्यात मार्च महिन्यातच लॉकडाउन करण्यात आले. गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. त्यामुळे वृक्षारोपण मोहीमसुद्धा राबविण्यात आली नाही. रोपवाटिकांमध्ये रोपे तशीच पडून आहे. काही शाळा व सामाजिक संघटनांकडून रोपांची मागणी होत आहे, पण ती फार अल्प असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यने सांगितले. 

हेही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...
 

मानवी गरजांच्या पूर्ततेसाठी मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होत आहे. आताचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास रस्ता चौपदरीकरणाच्या कामात हजारो डेरेदार वृक्षांची कत्तल झाली. तेवढ्याच झाडांची लागवड व संवर्धन होणार की, नाही यात शंकाच आहे. कारण वृक्षारोपण होते, पण त्या झाडांचे संवर्धन होत नाही.

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत ऑक्‍सिजन पार्क हा उपक्रम राबविण्यात आला, पण बोटावर मोजण्या इतक्‍याच ऑक्‍सिजन पार्कमध्ये झाडे आहेत. ज्या तुलनेत वृक्षांची कत्तल होत आहे. त्या तुलनेत वृक्षलागवड होत नाही. याचा पर्यावरणाला मोठा फटका बसला आहे. प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून किमान एक वृक्ष लावून संवर्धन करावे, असे आवाहन वृक्षप्रेमी करीत आहे. 

11 लाख रोपे तयार 
वनविभागाच्या आठ तालुक्‍यांतील 12 नर्सरीमध्ये 11 लाख रोपे तयार करण्यात आली आहे. यात 18 महिन्याचे साडेतीन लाख तर नऊ महिन्याचे साडेसात लाख रोपे आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions of seedlings in nurseries due to lockdown