मिल्टन मॉल संचालकाकडून अधिकाऱ्यांना धमकी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

नागपूर - फूटपाथ कवेत घेऊन त्यावर विक्रीसाठी साहित्य ठेवणाऱ्या धरमपेठेतील मिल्टन मॉल संचालकाने अतिक्रमण कारवाईस गेलेल्या अधिकाऱ्यांनाच धमकी दिल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. अधिकाऱ्यांनी त्याच्या धमकीला भीक न घालता कारवाई करीत विक्रीसाठी ठेवलेले साहित्य जप्त करीत शेड तोडण्याचा इशारा दिला. 

धरमपेठ झोनअंतर्गत सहायक आयुक्‍त महेश मोरोणे यांच्या नेतृत्वातील पथकाने आज धरमपेठ, सीताबर्डी परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई केली. धरमपेठ झोनमध्ये मिल्टन मॉलने फूटपाथपर्यंत दुकानातील साहित्य विक्रीस ठेवले. एवढेच नव्हे, मॉलमध्ये चढण्याच्या पायऱ्यांवरही विविध साहित्य विक्रीस होते. येथे कारवाईदरम्यान मिल्टन मॉलचा संचालक सहायक आयुक्त महेश मोरोणे यांच्यावर धावून गेला. त्याने अधिकाऱ्यांशी अरेरावी केली. अखेर सहायक आयुक्त मोरोणे यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांना फोन करताच मिल्टन मॉल संचालकाची घाबरगुंडी उडाली. त्याने मोरोणे यांच्याकडे क्षमायाचना केली. त्यानंतर पथकाने रस्त्यापर्यंत असलेले साहित्य जप्त केले. अनधिकृत शेड काढण्याचे निर्देशही त्याला देण्यात आले. या मॉलच्या बाजूलाच प्लॅस्टिक मग, बादली विक्रेत्याचे दुकान असून त्याच्याकडील साहित्यही जप्त करण्यात आले. येथील कारवाईनंतर पथकाने सीताबर्डीतील मोदी नंबर दोनमध्ये कारवाई केली. येथील रस्त्यापर्यंत आलेले शेड, पायऱ्या जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आल्या. कारवाईत एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.

अनधिकृत बांधकामही पाडणार 
मिल्टन मॉलचे बांधकामही अनधिकृत असल्याचे मनपातील एका अधिकाऱ्याने नमूद केले. या संबंधातील कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार असून, त्यानंतर कारवाई केली जाईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Milton Mall Director Beating to Municipal Officer Crime