मंत्री म्हणाले, बेकायदेशीर गुटख्या संबंधी माहिती द्या; मी करतो कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

डॉ. शिंगणे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुटखा बंदीच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.

बुलडाणा : राज्यात गुटखाबंदी आहे, मात्र बाहेरील राज्यातून अवैधरित्या गुटखा आपल्या राज्यात आढळल्यास त्या विषयी तातडीने तक्रार करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 222 365 या क्रमांकावर, 022-26592361 ते 65 किंवा comm.fda-mah@nic.in या ई मेल पत्त्यावर तक्रार केल्यास त्यावर तातडीने कारवाई केली जाणार आहे.

डॉ. शिंगणे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुटखा बंदीच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. या संदर्भात मोक्का सारखा कायदा लावता येईल का याबाबतची शक्यता पडताळून पाहण्याचे गृह विभागाला सांगण्यात आले आहे. राज्यात गुटखा बंदी असली तरी इतर राज्यातून गुटख्याचा साठा, वाहतूक आणि विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास सामान्य नागरिकांनीही सावध राहून यासंदर्भात आपली तक्रार नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Image result for rajendra shingne
मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

 

महत्त्वाची बातमी - बच्चू कडूंचा ताफा अडविला; मग घडले असे...

226 कोटी किंमतीचा गुटखा जप्त 
राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत एकूण सुमारे 226 कोटी 53 लाख किंमतीचा गुटखा व तत्सम प्रतिबंधीत अन्न पदार्थांचा साठा जप्त केला आहे. 4782 प्रकरणी राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोषीं विरुद्ध राज्यातील विविध न्यायालयात एकूण 6206 खटले दाखल करण्यात आले आहेत.

गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा परवाना रद्द
महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधात्मक आदेश काढल्यानंतर इतर राज्यांनी देखील गुटखा या अन्न पदार्थांवर प्रतिबंध केलेला आहे. इतर राज्यांमध्ये पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी या अन्न पदार्थांच्या उत्पादन व विक्रीत बंदी नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या सिमा भागातून चोरी/छुप्या मार्गाने हे अन्न पदार्थांची वाहतूक करुन विक्री केली जाते असे लक्षात आल्याने. गुटखा, पानमसाला व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थाची वाहतूक कायमची थांबावी म्हणून प्रशासनाने प्रतिबंधित अन्नपदार्थाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा वाहतुकीचा परवाना तसेच वाहन चालकाचा परवाना रद्द / निलंबित करण्याबाबत प्रशासनाने शासनाच्या मान्यतेने परिपत्रक काढलेले आहे.
आतापर्यंत प्रतिबंधित अन्नपदार्थाची वाहतूक करताना 438 वाहने पकडली आहेत. परिवहन विभागाकडे वाहनाचा व वाहनचालकाचा परवाना रद्द/निलंबीत करण्यासाठी 378 प्रस्ताव सादर केले गेले. तर आतापर्यंत 9 वाहनाचा व वाहनचालकाचा परवाना परिवहन विभागाकडून निलंबित/रद्द करण्यात आला आहे.

फसव्या जाहिरातींना आळा
काही तंबाखूजन्य उत्पादने, अल्कोहोलिक उत्पादने उत्पादक हे त्यांचे लोगो व ब्रॅण्ड यांचा वापर इतर खाद्य पदार्थांचे उत्पादन व विक्री करिता करतात. अशा छुप्या पद्धतीने तंबाखुजन्य उत्पादने, अल्कोहोलिक उत्पादने यांची जाहिरात करून जनतेची दिशाभूल करतात. त्यामुळे या उत्पादनांची नावे व लोगो इतर खाद्य पदार्थांना वापरण्यास बंदी घालण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. यामुळे तंबाखुजन्य उत्पादने, अल्कोहोलिक उत्पादने यांच्या नाव व लोगोच्या वापरामुळे सामान्याची दिशाभूल होणार नाही. त्यामुळे या विषयावर डॉ. शिंगणे यांनी लक्ष घातले आहे. तसा प्रस्ताव विधी व न्याय विभागाला पाठविण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister said, Provide information regarding illegal gutkha