esakal | मंत्री असावा तर असा; वीटभट्टी शाळेच्या मुलांना मिळाला दाता... 
sakal

बोलून बातमी शोधा

Bacchu Kadu

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शनिवारी, 15 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता "आमची वीटभट्टी' शाळेला भेट दिली. त्यांनी इतरांप्रमाणे कुठलंही कोरडं आश्वासन न देता खिशातून चक्क तीस हजार रुपये काढले आणि मुलांना शाळेत जाण्या-येण्यासाठी खर्च दिला.

मंत्री असावा तर असा; वीटभट्टी शाळेच्या मुलांना मिळाला दाता... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : मुलं म्हणजे देवाघरची फुलं. परंतु हजारो गरीब मुलांचे बालपण वीटभट्टीवर काम करणाऱ्या आपल्या मायबापांसोबत राहून कोमेजते. त्यांना शिक्षणापासून मुकावे लागते. अशा मुलांचं भावविश्व पुन्हा बहरण्यासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शनिवारी, 15 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता "आमची वीटभट्टी' शाळेला भेट दिली. त्यांनी इतरांप्रमाणे कुठलंही कोरडं आश्वासन न देता खिशातून चक्क तीस हजार रुपये काढले आणि मुलांना शाळेत जाण्या-येण्यासाठी खर्च दिला. केवळ एवढ्यावरच न थांबता या सर्व मुलांचे खाणे-पिणे, पोशाख यांसह सर्व खर्च वैयक्तिक करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

स्थानिक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने 23 जानेवारीपासून अंजनगावबारी मार्गावरील अडवाणी यांच्या शेतात वीटभट्टीवर काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी शाळा सुरू करण्यात आली. याकरिता प्राचार्य व शिक्षणाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत दररोज वीटभट्टी ते शाळा या दरम्यान जाणे-येणे व अध्यापनाकरिता विविध कर्मचाऱ्यांची ड्युटी लावली. यामध्ये शिक्षक, विषय सहायक व विषय साधनव्यक्ती यांचा प्रामुख्याने समावेश आहे. 

अवश्‍य वाचा- Video : बघा, यवतमाळचा वाहतूक पोलिस किती हक्काने करतो वसुली...

वीटभट्टी शाळेला आकस्मिक भेट

या विषयाची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सुद्धा दखल घेण्यात आली. शिक्षण व आरोग्य संदर्भातील व्यवस्था खुद्द वीटभट्टी चालकाने करावे, असे आदेश जिल्हाभरातील तहसीलदारांनी दिले. याप्रकरणी आता राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शनिवारी सकाळी वीटभट्टी शाळेला आकस्मिक भेट देत शाळेची वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी 40 च्या वर विद्यार्थी तेथे उपस्थित होते. भेटीदरम्यान या सर्व मुलांच्या शिक्षणाचा खर्च स्वतः करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर साखरशाळा, पाषाणशाळाच्या धर्तीवर वीटभट्टी शाळांसाठी धोरणात्मक निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. 

108 विद्यार्थी शाळेच्या नियमित प्रवाहात 

या वीटभट्टी परिसरात एक-दोन नव्हे तर तब्बल 108 विद्यार्थी शिक्षणाच्या नियमित प्रवाहात आले आहे. यामधील 20 विद्यार्थी मध्य प्रदेशमधील असल्याने तेथील शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे प्राचार्य डॉ. रवींद्र अंबेकर यांनी "सकाळ'ला सांगितले. 

राज्यात वीटभट्टी शाळांसाठी धोरण आणणार

राज्यातील प्रत्येक मुलं महत्त्वाचे असून त्याला शिक्षणाचा अधिकार आहे. त्यासाठी शिक्षण हक्क कायदा पण आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठी "साखर शाळा' आहेत, त्याचप्रमाणे वीटभट्टीवर कमा करणाऱ्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी धोरण आणणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.