अल्पवयीन मुले करतात हे बेकायदेशीर काम...पालकांत चिंता

ganja
ganja

गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून शहरातील गोकुळनगर हा वॉर्ड अवैध दारूविक्रीसोबतच आता गांजातस्करीचा प्रकार चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकवर्ग चिंतेत असून काही नागरिकांनी यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेऊन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शहरातील संवेदनशील परिसर म्हणून ओळख असलेल्या गोकुळनगर परिसर तसा अवैध दारूविक्रीने चर्चेत आहे. चोरी, हाणामाऱ्याच्या घटनाही येथे नेहमीच घडत असतात. मात्र, त्यात आता गांजाविक्रीची भर पडली आहे. पाण्याच्या टॉकीजच्या परिसरात काही युवक अल्पवयीन मुलांना हाताशी धरून अवैध धंदे चालवत आहेत. यात जुगार, दारूविक्रीचाही समावेश आहे. फारसे श्रम न करता पैसे मिळत असल्याने शाळा सोडून अनेक मुले तस्करांना मदत करीत असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सायंकाळी साडेसहा वाजतापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत अवैध व्यवसाय सुरू असतो. यासंदर्भात नागरिकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना निवेदन देऊन अवैध धंदे बंद करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

नागरिकांनी केली जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
या निवेदनानंतर पोलिसांनी एक दिवस थातूरमाथूर कारवाई करून काही युवकांना दम दिला. मात्र, यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली असून तक्रारकर्त्या नागरिकांना दारू व गांजा तस्करांकडून शिवीगाळ करून धमक्‍या दिल्या जात आहेत. या समस्येमुळे गोकुळनगर भागातील सामाजिक आरोग्य बिघडण्याची शक्‍यता असून अवैध व्यवसायात अल्पवयीन मुलांच्या सहभागाने पालकांत चिंता व्यक्त केली जात आहे. अवैध धंद्यात गुंतलेली मुले शाळेत न जाता तस्करांच्या मदतीसाठी भटकत असल्याने येथे गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Video : रुग्णालयातील कोरोनाग्रस्ताचे कपडे कोण धुणार? निर्माण झाली ही अडचण

कधी सुरू होणार पोलिस चौकी
गोकुळनगर वॉर्डातील अवैध व्यवसाय तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने नागरिकांच्या मागणीवरून येथे पोलिस चौकी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी जागाही निश्‍चित करण्यात आली असून तेथे पोलिस चौकीचा फलकसुद्धा लावण्यात आला. काही वर्षांपूर्वी या जागेवर अतिक्रमणसुद्धा करण्यात आले होते. मात्र, नागरिकांच्या तक्रारीनंतर अतिक्रमण हटवून पोलिसांनी तेथे फलक लावला. परंतु दोन वर्षांचा कालावधी उलटूनही पोलिस चौकीचे काम प्रत्यक्षात सुरू झाले नाही. त्यामुळे अवैध दारूविक्री, गांजातस्करीला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पोलिसांनी अवैध धंद्यांना आळा घालून तत्काळ पोलिस चौकी सुरू करावी, अशी मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com