ट्रम्पना मिसळ, मोदींना उसळ द्यायची आहे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

नागपूर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनार्ल्ड ट्रम्प यांना मिसळ चाखवायची आहे तर नवरात्रोत्सवात पंतप्रधान मोदींना साबुदाण्याची उसळ द्यायची आहे. मराठी माणूस व्यवसाय करूच शकत नाही, असे आपलेच लोक बोलतात. त्याचसाठी मी सात वर्षांपासून नऊवारीत जगभ्रमंती करते आहे. सगळे ठरले आहे, मी कठाळे गुरुजींची सून आहे. पुढच्या पाच वर्षांत जग जिंकायचे आहे असे जयंती कठाळे म्हणाल्या.

नागपूर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनार्ल्ड ट्रम्प यांना मिसळ चाखवायची आहे तर नवरात्रोत्सवात पंतप्रधान मोदींना साबुदाण्याची उसळ द्यायची आहे. मराठी माणूस व्यवसाय करूच शकत नाही, असे आपलेच लोक बोलतात. त्याचसाठी मी सात वर्षांपासून नऊवारीत जगभ्रमंती करते आहे. सगळे ठरले आहे, मी कठाळे गुरुजींची सून आहे. पुढच्या पाच वर्षांत जग जिंकायचे आहे असे जयंती कठाळे म्हणाल्या.
एसजीआर नॉलेज फाउंडेशन व चिटणवीस सेंटर यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत जगप्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्रीय रेस्टॉरंटच्या संचालिका जयंती कठाळे यांनी नागपूरकरांशी संवाद साधला. मी नागपूरकर असून, आपल्याच वऱ्हाडी भाषेत संवाद साधण्यास आली असल्याचे प्रारंभीच त्यांनी सांगितले. आपल्या व्यवसायाची स्थापना कशी झाली हे सांगताना जयंती यांनी व्यवसाय करताना सगळी कर्मकांड घरी ठेवून येण्याचादेखील सल्ला दिला. नवोद्योजकाने व्यवसायाचे संपूर्ण नियोजन कसे करावे याचा अभ्यास करूनच गुंतवणूक करावी. माझ्या व्यवसायाचे तत्त्व वेगळे असून, आमच्या येथे ताट स्वच्छ करणाऱ्यास पाच टक्‍के सूट देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. व्यवसाय प्रारंभ करताना सामान्य घरातील व्यक्‍तीला येतात असे अनुभव त्यांच्याही वाट्याला आल्याचे सांगताना जयंती यांनी, दोनशे कर्मचारी, चौसष्ष्ट वर्षांची मुख्य शेफ, एकवीस वर्षीय मॅनेजर इतकेच नव्हे तर अस्खलित मंत्रपुष्पांजली म्हणणारा मणीपुरी मुलगा, काकू थालीपीठ खाल की, पुरणपोळी असा विचारणारा पंजाबी मुलगा व्यवसाय उत्तमपणे सांभाळतो याचा अभिमान असल्याचे सांगितले. मराठी माणसाची संस्कार हीच शिदोरी असते. त्याचे महत्त्व जपत पुढे जाण्याचा निर्धार व्यक्‍त करत, पूर्णब्रह्म व्यवसायास हातभार लावण्याचे आवाहन केले. आता व्यवसाय पाच हजारांचा नव्हे तर पन्नास हजार डॉलर्सचा करायचा असल्याचे जयंती कठाळे यांनी सांगितले.
कोण आहेत जयंती कठाळे?
मूळच्या नागपूरच्या असलेल्या जयंती कठाळे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. आयटी क्षेत्रात कार्यरत असताना विमान प्रवासात मराठी पदार्थ मिळाले नसल्याची समस्या त्यांच्या नशिबी आली. त्यानंतर त्यांनी स्वतःचे मराठी उपाहारगृह उभारले. अन्‌ नाव ठेवले "पूर्णब्रह्म'. वरणभात, पुरणपोळी, थालीपीठ यांसारखे पदार्थ विकणाऱ्या नऊवारी साडीत व्यवसाय करण्याचा नवीन पायंडा पाडला. त्यांच्याकडील कर्मचारी साडी, धोतर, पगडी अशाच वेशात असतात. सध्या बंगळूरूसह ऑस्ट्रेलिया, अमेरिकेसह विविध देशांत त्यांचा व्यवसाय आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: misal to trump amd usal to modi