गंभीर! महिला पोलिस अधिकाऱ्याचा भाजप शहराध्यक्षाकडून विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

- आमदारासह दोघांवर गुन्हा दाखल

तुमसर (जि. भंडारा) : बांधकाम कामगारांना सुरक्षा किट वाटपादरम्यान, शासकीय कामात अडथळा निर्माण करून महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यावेळी भाजप आमदार चरण वाघमारे हेदेखील उपस्थित असल्याने त्यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर घटना सोमवार (ता. 16)ची आहे. सोमवारी तालुक्‍यातील बांधकाम कामगारांना येथील सुरक्षा किटचे वितरण करण्यात येत होते. सुरक्षा किटचे ट्रॅक येताच कामगारांची एकच झुंबड उडाली. यावेळी भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांची महिला पोलिस उपनिरीक्षकासोबत बाचाबाची झाली. या घटनेची माहिती मिळताच आमदार चरण वाघमारे हेसुद्धा तेथे पोहोचले. महिला पोलिस उपनिरीक्षक आमदारांसोबत बोलत असताना शहराध्यक्षांनी शिवीगाळ करून विनयभंग केला, अशी तक्रार सदर महिला पोलिस अधिकाऱ्याने तुमसर पोलिसात केली. या तक्रारीच्या आधारावर आज, बुधवारी पोलिसांनी अनिल जिभकाटे यांच्यासह आमदार वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल केला.

कामगारांची ठाण्यावर धडक
सोमवारी घडलेल्या प्रकरणाची आज, बुधवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे कळताच आमदार चरण वाघमारे यांनी शेकडो कामगारांसह पोलिस ठाण्यावर धडक दिली. यावेळी पोलिस निरीक्षक सिडाम यांना निवेदन देऊन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात तणावाचे वातावरण होते.

कामगारांच्या गोंधळाच्या वेळी सदर महिला पोलिस अधिकाऱ्याची वागणूक चांगली नव्हती. राजकीय द्वेषातून मला बदनाम करण्याचे हे सुनियोजित कटकारस्थान आहे. सदर प्रकरणाची चौकशी करावी व मी दोषी आढळल्यास मलाही अटक करावी.
- चरण वाघमारे
आमदार, तुमसर विधानसभा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: misbehave with women police officer, complaint against bjp leader