शेतकरी स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांची महिला तहसीलदारास शिविगाळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

- महसूल कर्मचारी रस्त्यावर, लेखी माफीनामा देण्याची मागणी

यवतमाळ : शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी घाटंजीच्या तहसीलदार पूजा माटोडे यांच्या बाबतीत अपशब्द वापरून त्यांचा अवमान केल्याचा आरोप महसूल विभागाच्या सात कर्मचारी संघटनांनी केला असून तिवारींच्या निषेधार्थ संपाचा पवित्रा घेतला आहे. उद्या शुक्रवारी 20 तारखेला कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे.
कर्मचारी संघटनांचे म्हणणे असे की, तिवारी यांनी बुधवारी (ता.18) घाटंजी येथे कर्ज मेळाव्याबाबत बैठक घेतली. बैठकीची नियोजित वेळ सकाळी अकराची असताना अध्यक्ष दीड वाजता आले. काम असल्याने तहसीलदार कार्यालयात होत्या. त्यांनी बैठकीसाठी नायब तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांना पाठविले; तसेच मिशनचे अध्यक्ष आल्यानंतर माहिती देण्यास सांगितले होते. मात्र, बैठकीत तिवारी यांनी महिला तहसीलदारांबाबत अपशब्दांचा वापर केला. शिवाय, नायब तहसीलदारांनाही अपमानित केले.
याप्रकरणी तिवारी यांचा निषेध म्हणून उद्या शुक्रवारी (ता.20) कर्मचारी संघटनांनी बंद पुकारला आहे. या संपात तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, महसूल कर्मचारी संघटना, वाहनचालक, चतुर्थश्रेणी कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल यांचा समावेश आहे. सर्व संघटनांनी तिवारींकडून लेखी माफीनामा मागितला आहे. तो न मिळाल्यास पुढील आंदोलनाची दिशा उद्या शुक्रवारी ठरविणार असून, यापुढे तिवारी यांच्या सर्व बैठकांवर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे सचिव दिलीप झाडे यांनी सांगितले.

घाटंजीच्या पीककर्ज वाटप मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांनी तहसीलदार पूजा माटोडे यांच्याविषयी तक्रारी केल्यात. या मेळाव्यात अधिकाऱ्यांना काही माहिती विचारली असता तीसुद्धा अधिकाऱ्यांना देता आली नाही. त्यामुळे रागाच्या भरात आपण अधिकाऱ्यांना सुनावले, मात्र, कोणाचा अवमान करणारी भाषा वापरली नाही. तरीही माझ्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची मने दुखावली असतील तर त्यांची मी विनाशर्त माफी मागतो. मी दोषी असल्यास माझ्या विरोधात फौजदारी कारवाई करावी.
- किशोर तिवारी
अध्यक्ष, शेतकरी स्वावलंबन मिशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: misbehave with women tahsildar