मृत्यूला कवटाळताना मिश्रा यांच्या अवयवदानातून तिघांना जीवनदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

नागपूर ः अपघातात गंभीर जखमी झाल्याने नागपुरातील भास्कर विश्‍वनाथ मिश्रा (वय 52) यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले.
आयुष्याच्या अंतिम क्षणी मृत्यूला कवटाळताना शरीरातील अवयवदान करून तिघांना जीवनदान दिले आहे. कायमचे सोडून जाणार असल्याचे दुःख पचवणे नातेवाइकांना कठीण होते, परंतु दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतरही नातेवाइकांनी अवयवदानाचा निर्णय घेत समाजासमोर एक नवीन आदर्श घालून दिला आहे.

नागपूर ः अपघातात गंभीर जखमी झाल्याने नागपुरातील भास्कर विश्‍वनाथ मिश्रा (वय 52) यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले.
आयुष्याच्या अंतिम क्षणी मृत्यूला कवटाळताना शरीरातील अवयवदान करून तिघांना जीवनदान दिले आहे. कायमचे सोडून जाणार असल्याचे दुःख पचवणे नातेवाइकांना कठीण होते, परंतु दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतरही नातेवाइकांनी अवयवदानाचा निर्णय घेत समाजासमोर एक नवीन आदर्श घालून दिला आहे.
आनंद अपार्टमेंटमधील रहिवासी भास्कर मिश्रा यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यांना तत्काळ मानकापूर येथील ऍलेक्‍सिस हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. डॉक्‍टरांनी तत्काळ मेंदूवर शस्त्रक्रिया सांगितली. लगेच दुसऱ्या दिवशी मेंदू शल्यचिकित्सक डॉ. हुसैन बाटी, डॉ. अभिषेक वानकर यांच्या वैद्यकीय पथकाने त्यांच्या मेंदूवर शल्यक्रिया केली. त्यांना वाचविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते.
मात्र, शनिवारपर्यंत त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला. पुढे उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याचे जाणवले. त्यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या. यात भास्कर यांच्या मेंदूपेशी मृत झाल्याचे निदान डॉक्‍टरांनी केले.
मेंदूपेशी मृत पावल्याने आता भास्कर पुढे जग बघू शकणार नाही, हे स्पष्ट झाल्यामुळे अवयवदान करण्यासंदर्भात नातेवाइकांचे डॉ. मृणाल खोडे यांच्या पथकाने समुपदेशन केले. भास्कर मिश्रा यांची मुलगी अंकिता, जावई केदार होटा आणि पुतण्या सुधांशू मिश्रा यांनी अवयवदानासाठी लेखी परवानगी दिली. रुग्णालयातील मेंदूमृत समितीने मेंदूपेशी मृत झाल्याचे प्रमाणित केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. यानंतर विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, डॉ. रवी वानखेडे यांना माहिती दिली. प्रतीक्षा यादी तपासण्यात आली. त्यानुसार ऍलेक्‍सिसमध्ये किडनीच्या प्रतीक्षेत असलेल्या 23 वर्षीय तरुणाला तर ऑरेंज सिटी रुग्णालयात प्रतीक्षा यादीत 44 वर्षीय महिला रुग्ण होती. त्यांना किडनीदान करण्याचे निश्‍चित झाले. तर मेडिट्रिना रुग्णालयात यकृताच्या प्रतीक्षेत असलेल्या 54 वर्षीय रुग्णाला यकृत प्रत्यारोपित केले गेले.

यांनी केली शस्त्रक्रिया
शल्यचिकित्सक डॉ. संजय कोलते, डॉ. संजय कृपलानी, डॉ. अजय पाटेकर, डॉ. सविता जैस्वाल, डॉ. प्रिती जैन, डॉ. नीलेश अग्रवाल, ऑरेंज सिटीचे संचालक डॉ. अनुप मरार, मेडिट्रिनाचे डॉ. समीर पालतेवार, डॉ. रवी मोहनका, डॉ. प्रशांत राव, डॉ. अनुराग श्रीमल, डॉ. अंकुश गोल्हर, डॉ. अमित पसारी, डॉ. सुहास साल्पेकर, डॉ. संदीप देशमुख, डॉ. नीता देशपांडे यांच्या वैद्यकीय पथकाने अवयव प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mishra's life-threatening death for all three while embracing death