बुलडाणा - बोडखा भिलखेड ग्रामपंचायतीचा असाही प्रताप..

grampanchayat
grampanchayat

संग्रामपूर (बुलडाणा) : तालुक्यातील बोडखा भिलखेड येथे शासकीय जागा खाजगी लोकांच्या नावावर करून तत्कालीन सचिवाने माया जमवल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. कामे न करताच खर्च दाखवून हजारो रुपयाचे धनादेश काढण्यात आले.

नवीन सरपंचांनी मासिक सभेत जुना खर्च नामंजूर केल्याने या ग्रामपंचायतीत गौडबंगाल असल्याचा संशय बळावला आहे. या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाल्यास बरेच काही समोर येण्याची शक्यता  वर्तविली जात आहे.

या अगोदर असलेले ग्रामसचिव यांनी भिलखेड मधील न्यायालयीन वादाच्या खाजगी जागेत हस्तक्षेप करून ती जागा चिरीमिरी करून एकाच्या नावे केली. सोबतच कुठलाही पुरावा नसताना शासकीय जागा वैयक्तीक नावाने केल्याचा प्रकार प्रभारी गटविकास अधिकारी यांच्या भेटीने उघड झाला. एकूण 68 जागांच्या कागदपत्राचा घोळ असल्याचे प्राथमिकता म्हणून समोर आले आहे. ग्रामपंचायतीचे पाच वर्षांची रेकोर्ड तपासणी केल्यास खूपच मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चौदाव्या वित्त आयोगातील निधी बाबत ही साशंकता निर्माण होत आहे. कारण या मध्ये काही खाजगी लोकांच्या नावाने धनादेश काढून रक्कम काढल्याची चर्चा होत आहे. ज्या जागांच्या कागदपत्राचा घोळ आहे त्या यादीत ग्रामपंचायतीचे सदस्य ही आहेत.

दोन्ही गावातील मोक्याच्या शासकीय जागांवर अतिक्रमण करून त्या साठी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सचिव यांनी सहकार्य करून नोंद करण्याचा प्रयत्न म्हणजे शासकीय दृष्टया फसवणूकच म्हणावी लागेल. सद्य स्थितीत गावविकासासाठी शासकीय जागाच शिल्लक नसल्याने कामेच होऊ शकत नाही. या ग्रामपंचायतीच्या जुन्या कारभाराची चौकशी पंचायत समिती स्तरावरून न करता वरिष्ठ पातळीवरून केल्यास  ग्रामपंचायतीचे पितळ उघडे पडल्या शिवाय राहणार नाही.

या संदर्भात काही ग्रामस्थ ग्रामविकास मंत्रालयाकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे. येथील घरकुल लाभार्थी  निवड यादी मध्ये ही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी हस्तक्षेप करून आर्थिक देवाण घेवाणीचे व्यवहार केले आहेत. म्हणूनच येथील निवड यादी आणि मजूर लाभार्थी याची पडताळणी झाल्यास क्रमवारीचा ताळमेळ लागत नाही हे दिसून येईल. घरकुलच्या प्रकरणातच येथील टाक नामक सचिव लाच घेताना पकडण्यात आला होता. त्याच यादीतील लाभार्थी निवडीसाठी आता नवीन सरपंचाला अनुक्रमते नुसार निवड करण्याचे प्रभारी गट विकास अधिकारी देशमुख यांनी सांगितले. हा निकोप कारभाराचा भाग म्हणावा लागेल. परंतु या अगोदर अनुक्रमाचा मेळ लागत नसलेली घरकुलची कामे सुरु आहेत. त्या साठी काहीच कार्यवाहीची तरतूद नाही का? असा ही प्रश्न निर्माण  होत आहे.

रस्त्यात बांधलेली घरे ही नावाने करून देणे, नागरिकांचे नळ कनेक्शन पोटी घेतलेले डीपॉझिटचे बाँड परस्पर तोडून त्या रकमेची विल्हेवाट लावणे अशी कामे घडताना दिसतात. आतापर्यंतचे सर्व रेकोर्ड तपासले गेले तर या ग्रामपंचायत आणि संबंधित कारभारा बाबत वरिष्ठ ही चक्रावून जातील अशी स्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com