बेपत्ता पती ६ महिन्यांनी गवसला

बेपत्ता पती ६ महिन्यांनी गवसला

नागपूर - कामाच्या शोधात पती घरून निघून गेला. एक एक दिवस करीत सहा महिन्यांचा काळ लोटला. मंगळवारी नागपूर रेल्वेस्थानकावर अचानक बेपत्ता पती आणि पत्नी समोरासमोर आले. दोघेही नि:शब्द एकमेकांकडे बघतच उभे राहिले. दोघांच्याही डोळ्यातून भळभळत वाहणाऱ्या अश्रुधारा इतरांना भावनांची अनुभूती करून देणाऱ्या ठरल्या. 

प्रकाश उईके असे पतीचे तर सुनीता असे पत्नीचे नाव आहे. ते पांढूर्णाच्या राजना गावचे रहिवासी आहेत. १३ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. त्यांना ९ आणि १२ वर्षांची दोन मुले आहेत. निरक्षर असलेला प्रकाश कधीही गावाबाहेर गेला नव्हता. सहा महिन्यांपूर्वी प्रथमच कामाच्या शोधात तो गावातल्या काही मुलांसोबत गावाबाहेर गेला. पुणे गाठून गुळाच्या कारखान्यात काम सुरू केले. पहिल्या पगारातील ६ हजार रुपये त्याने गावाकडे पाठवून दिले. त्यानंतर काही दिवसांमध्ये प्रकाशला पुण्यातच सोडून त्याचे सहकारी गावी परतले. प्रकाशला गावी कसे परतायचे काहीच सुचत नव्हते. फोन नंबरही नसल्याने कुटुंबीयांशी बोलताही येत नव्हते. तिकडे कुटुंबीयही चिंतेत होते. प्रकाशच्या शोधात त्यांनी मोठा खर्चही केला. पण, उपयोग झाला नाही. तिकडे प्रकाशला दुसरी नोकरी मिळाली. तिथल्या सहकाऱ्याला आपबीती सांगून मदतीची गळ घातली. त्याने खटाटोप करीत राजना गावच्या सरपंचाचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यावर संपर्क साधून प्रकाशला मंगळवारी नागपूर स्थानकापर्यंत आणून देत असल्याचे सांगितले. सरपंचाने सुनीताला त्याबाबत माहिती दिली. प्रकाशला नागपूर स्थानकावर सोडून मित्र परतीच्या प्रवासाला निघाला. पती-पत्नी दोघांनाही शोधत फिरत होते. लोहमार्ग ठाणे परिसरात दोघेही आमोरासमोर आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com