आत्महत्या, बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात हयगय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

अमरावती : अंजनगावसुर्जी तालुक्‍यात टाकरखेडा (मोरे) येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार व तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात पोलिसांनी हयगय केली आहे. त्यामुळे संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी नातेवाइकांनी मंगळवारी (ता. 6) जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली.

मृत मुलगी 17 वर्षांची होती. लग्नाचे आमिष देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. पश्‍चात अश्‍लील व्हिडिओ इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. 24 जूनला सायंकाळी मुलगी घरात रडत होती. तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगितला. ती रात्रभर रडत होती. 25 जूनला ती संबंधित युवकाशी भ्रमणध्वनीवर बोलत रडतच घरातून बाहेर पडली. तिचा सर्वत्र शोध घेतला व घटनेची तक्रार ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी शुभम विनायक वाघमारे याच्याविरुद्ध तिला पळवून नेल्याचा गुन्हा नोंदविला. 30 जूनला तिचा मृतदेह रामराव पवार यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला. त्याच ठिकाणी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. कुटुंबीय पोलिसांकडे गुन्हा नोंदविण्यासाठी गेले असता त्यांची टिंगल उडविण्यात आली. तसेच पुन्हा तक्रार घेऊन आल्यास तुमच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला जाईल, अशी तंबी पोलिसांनी दिली.
संबंधित युवकाविरुद्ध बलात्कार व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी मृत मुलीच्या आईने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनातून केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Missing suicides, rape offenses