esakal | मिशन मॅथेमॅटिक्स; या गावात चक्क भिंती शिकवतात गणित, युवा अभियंता राबवतोय खास उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

राज्यभरात शैक्षणिक सत्र सुरू झाले असताना विद्यार्थी मात्र शाळेत नाहीत.पोंभुर्णा तालुक्‍यातील घोसरी या छोट्या गावातील अक्षय वाकुडकर या युवा अभियंत्याने वेगळीच शक्कल लढविली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळा व शिक्षणापासून दूर जाऊ नये, यासाठी त्याने गावातील प्रमुख चौकातल्या भिंती बीजगणित व भूमिती यांच्या उदाहरणांनी रंगवून टाकल्या आहेत.

मिशन मॅथेमॅटिक्स; या गावात चक्क भिंती शिकवतात गणित, युवा अभियंता राबवतोय खास उपक्रम

sakal_logo
By
श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर : कोरोनाच्या संकटाने नव्या शैक्षणिक वर्षात शिक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी राज्यभर विविध नावीन्यपूर्ण उपक्रम घेण्यात येत आहेत. जिल्ह्यात खेडेगावातील भिंती गणिताच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासाने रंगवून एका युवा अभियंत्याने अनोखी शक्कल लढवली आहे. जिल्हा परिषदेने ही संकल्पना उचलून धरत हा उपक्रम जिल्हाभर राबविण्याचे ठरविले आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाने कोरोना साथरोग संकटाच्या काळात नवे शैक्षणिक वर्ष जुलैच्या प्रारंभी कागदोपत्री का होईना पण सुरू केले. प्रत्यक्षात राज्यातील ग्रामीण भागातल्या सर्वच शाळा कोरोना बाधितांसाठी विलगीकरण केंद्रे म्हणून वापरण्यात आल्या. त्यामुळे प्रत्यक्षात शाळा सुरू होणे सध्या तरी शक्‍य नाही.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा

राज्यभरात शैक्षणिक सत्र सुरू झाले असताना विद्यार्थी मात्र शाळेत नाहीत. याच काळात दीक्षा ऍपच्या माध्यमातून अथवा ऑनलाइन शिक्षण प्रणालीद्वारे विद्यार्थी शिकत आहेत. हाच प्रयोग कल्पक रीतीने पुढे नेण्यासाठी पोंभुर्णा तालुक्‍यातील घोसरी या छोट्या गावातील अक्षय वाकुडकर या युवा अभियंत्याने वेगळीच शक्कल लढविली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळा व शिक्षणापासून दूर जाऊ नये, यासाठी त्याने गावातील प्रमुख चौकातल्या भिंती बीजगणित व भूमिती यांच्या उदाहरणांनी रंगवून टाकल्या आहेत.
 

जाणून घ्या : ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन

विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम

गणिताची विविध समीकरणे व नफा- तोटा -वर्तुळ-त्रिज्या असे गणिताचे सर्व प्रमुख घटक आता थेट गावातील भिंतींवर नजरेस पडत आहेत. मुख्य म्हणजे हे सर्व स्वखर्चाने व सहकाऱ्यांच्या मदतीने केले जात आहे. परिणामी शाळेत न जाणारे मात्र गल्लीबोळात विविध खेळ खेळणारे विद्यार्थी ही समीकरणे अथवा उदाहरणे पाहून सहज शिकत आहेत. या अशा गणिताच्या अभ्यासाच्या भिंती रंगविण्याचा मोठाच फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. विद्यार्थ्यांची नाळ शिक्षणापासून तुटू नये, हे या 'मिशन मॅथेमॅटिक्‍स' प्रयोगाने शक्‍य झाले आहे. अक्षय स्वतः गावातील जिल्हा परिषद शाळेतून शिकत पुढे अभियंता झाला.

अवश्य वाचा :  हॅलोऽऽ शिंगरू गावात चितळाचे मांस शिजत आहे; वनविभागाने भाजीच ताब्यात घेतली, पुढे
 

गणिताच्या माहितीने भिंती रंगविणार
अक्षय वाकुडकर याने ग्रामीण भागात राबविलेली ही संकल्पना जिल्हा परिषदेने तातडीने स्वीकारली आहे. जिल्हा परिषदेने आता शाळा बंद असताना विविध तालुक्‍यांमधील ग्रामीण भागातल्या चौकातील प्रमुख भिंती अशाच पद्धतीने गणिताच्या माहितीने रंगविण्याचे ठरविले आहे.
- राहुल कर्डीले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

loading image
go to top