भेसळखोरांचे छायाचित्र प्रसिद्ध करा - गडकरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

नागपूर - खाद्यान्नातील भेसळीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्यासाठी जप्त केलेल्या नमुन्याची आठ दिवसांत तपासणी करा. भेसळीचा गुन्हा सिद्ध झाल्यावर गुन्हेगारांचे फोटो माध्यमांनी प्रसिद्ध करावे जेणेकरून गुन्हेगारांवर सामाजिक जरब बसेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. डांबरी रस्त्यात प्लॅस्टिक व रबराचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर - खाद्यान्नातील भेसळीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्यासाठी जप्त केलेल्या नमुन्याची आठ दिवसांत तपासणी करा. भेसळीचा गुन्हा सिद्ध झाल्यावर गुन्हेगारांचे फोटो माध्यमांनी प्रसिद्ध करावे जेणेकरून गुन्हेगारांवर सामाजिक जरब बसेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. डांबरी रस्त्यात प्लॅस्टिक व रबराचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रयोगशाळा तसेच इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अन्न व नागरी पुरवठा व अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री मदन येरावार  उपस्थित होते. गडकरी म्हणाले, अन्न व औषध प्रशासनाने जनतेला वेळेत व ऑनलाइन सेवा द्याव्या. पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त सेवेचे समाधान जनतेला व शासनाला द्यावे. 
पाश्‍चिमात्य देशात अन्न व औषधांना देण्यात येणारे उच्च मूल्य या विभागाने द्यावे. तसेच मोठ्या उद्योजकांनी अन्नशुद्धीला प्राधान्य द्यावे. देशात सिमेंटच्या रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे. त्याची गुणवत्ता चांगली असली तरी आता डांबरी रस्त्यांमध्ये प्लॅस्टिक व रबराचा वापर करण्यात येईल. या डांबरी रस्त्यात निरुपयोगी प्लॅस्टिकचा उपयोग करण्यासाठी यापूर्वीच शासननाने मंजुरी दिली असल्याचे गडकरी यांनी सांगितले. महिलांमध्ये औषध कंपन्या येण्यास तयार आहे. यासाठी १,२०० कोटींचे करार झाले असून, सात-आठ कंपन्यांनी उत्पादने सुरू केल्याचे गडकरी यांनी सांगितले.

प्रोडक्‍टवर वस्तुस्थिती पाहिजे
सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल तेलात पामोलिन तेलाचा २५ ते ३० टक्के वापर होता. मात्र, कंपन्यांकडून शंभर टक्के शुद्घ तेल असल्याची जाहिरात करण्यात येते. पामोलिन तेलाच्या उपयोगास मान्यता असली तरी प्रोडक्‍टवर वस्तुस्थिती दर्शवली पाहिजे. याकडे विभागाने लक्ष्य देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. 

गुटखा विक्रेत्यांना जन्मठेप - बापट 
नागपूर - गुटखा मनुष्यासाठी हानिकारक असल्याने त्यावर बंदी घातली आहे. मात्र, शेजारच्या राज्यात बंदी नसल्याने त्याची विक्री होत आहे. गुटखा विक्री करण्याऱ्या विरुद्ध कायद्यात सहा महिन्याच्या शिक्षेची तरतूद आहे. हा कायदा अधिक कठोर करून किमान तीन ते जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे दिली. 

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सिव्हिल लाइन्स येथील नव्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते विकास व जलसंधारणमंत्री नितीन गडकरी,  अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार, विभागाचे सचिव संजय देशमुख, आयुक्त पल्लवी दराडे, सहआयुक्त शशिकांत केकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, आमदार अनिल सोले, सुधाकर कोहळे उपस्थित होते. बापट म्हणाले, काही नागरिक अन्नात व दुधात भेसळ करतात, त्यांना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.  जुन्या कायद्यातील त्रुटीवर अभ्यास करून अन्न भेसळ करणाऱ्यांना कडक शासन करणारा कायदामंत्री मंडळासमोर ठेवणार आहे. विभागाकडून फिरते प्रयोगशाळा सुरू करण्यात आली  असून, त्या माध्यमातूनही रस्त्यावर विक्री होणाऱ्या अन्नांची तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: mixing picture crime nitin gadkari