चंद्रपुरात शामकुळेंना हक्काचे घर! 

file Photo
file Photo

चंद्रपूर : दहा वर्षांपासून चंद्रपूरचे आमदार असलेले नाना श्‍यामकुळे यांनी आता चंद्रपुरात हक्काचे घर शोधणे सुरू केले आहे. सध्या त्यांचे जनसंपर्क कार्यालय आणि निवासस्थान भाड्याच्या घरात आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला या मतदार संघात मिळालेल्या मताधिक्‍क्‍याने समीकरण बदलले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हक्काच्या घराची शोधमोहीम सुरू केली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 
मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर चंद्रपूर विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यावेळी चंद्रपुरातील उमेदवार देण्याऐवजी भाजपने नागपुरातून श्‍यामकुळे यांना आयात केले. निवडणुकीच्या ऐन पंधरा दिवसआधी श्‍यामकुळे चंद्रपुरात आले आणि विजयी झाले. त्यानंतर 2014 मध्येही त्यांनी विजयी परंपरा कायम ठेवली. या काळात त्यांनी जनसंपर्क कार्यालयासाठी येथील गंजवार्ड परिसरात एक घर भाड्याने घेतले. याच घरी त्यांचे कार्यालय आणि निवासस्थान आहे. 
पालकमंत्री, मंत्री किंवा पक्षाचा कार्यक्रम असला, तरच श्‍यामकुळे चंद्रपुरात दिसतात. आठवड्यातून चार ते पाच दिवस श्‍यामकुळे नागपूरचे रहिवासी असतात. त्यामुळे त्यांना आजवर चंद्रपुरात हक्काच्या घराची गरज पडली नाही, असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र, आता लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली आहे. चंद्रपूर विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला तब्बल 25 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. गेल्या तीस वर्षांच्या काळात प्रथमच या मतदार संघात कॉंग्रेसने आघाडी घेतली. त्यामुळे श्‍यामकुळेंसह भाजप नेतेही अचंबित झाले आहेत. एरवी भाजपचे मतदार, जातीय समीकरण आणि पक्षाचे संघटन यावर हमखास निवडून येऊ, याच हवेत श्‍यामकुळे असायचे. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर ते सावध झाले. आता विधानसभा निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. बदललेली परिस्थिती कठीण आहे, याची जाणीव त्यांना आहे. त्यातच विरोधक श्‍यामकुळेंना "पार्सल' ठरविण्याच्या तयारीत आहेत. या मुद्‌द्‌यातील हवा काढण्यासाठी श्‍यामकुळेंनी हक्काचा निवारा शोधणे सुरू केले, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com