आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आमदार एकवटले

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

नागपूर - नागपुरातील मराठा आरक्षण मोर्चा, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांचा राजीनामा आणि बुलडाणा जिल्ह्यातील दंगलीवरून विधानसभेचे कामकाज बुधवारी तीन वेळा तहकूब करण्यात आले. दरम्यान, सर्वपक्षीय मराठा आमदारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी सभागृहात केली. मोर्चाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसेनेतील मराठा आमदार भगवे फेटे, तर विरोधी पक्षांतील मराठा आमदार भगव्या टोप्या घालून सभागृहात आले होते. तर, मोर्चानंतर विरोधी पक्षांतील मराठा आमदारांनी विधानभवनासमोर राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

मराठा आरक्षणासाठी नागपुरात काढण्यात आलेल्या मोर्चाचे तीव्र पडसाद विधानसभेच्या कामकाजावर पडल्याचे दिसून आले. जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी दुसऱ्या दिवशीही पुन्हा लावून धरली. तसेच, बुलडाणा जिल्ह्यातील दंगलीवरूनही विरोधकांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हे तिन्ही मुद्दे उपस्थित केले. प्रश्नोत्तराचा तास थांबवून यावर चर्चा व्हावी अशी मागणीही केली. राज्य सरकारने या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस फेटाळून लावत प्रश्नोत्तराचा तास पुकारला, त्यामुळे विरोधक अध्यक्षांच्या आसनासमोरील जागेत येऊन गोंधळ करू लागले. यावरून सभागृह पहिल्यांदा वीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. त्याआधी विखे पाटील यांनी शिवसेनेचे आमदार फेटे घालून आल्याबाबत आक्षेप नोंदवला. ते म्हणाले, ""शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे, तरीही मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, त्यामुळे शिवसेनेने फेट्यांऐवजी काळ्या फिती लावून निषेध नोंदवायला हवा.'' त्यावर मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविण्यासाठीच फेटे बांधून आल्याचे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे याचा पुनरुच्चार करीत या संदर्भात राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही केली. त्यानंतरही विरोधकांनी गोंधळ घातल्याने कामकाज दोनदा तहकूब झाले. दुपारी दीडनंतर सभागृहाचे कामकाज सुरळीत चालले.

Web Title: MLA reservation for Maratha concentrated demand