आमदारपुत्रांना सशर्त जामीन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

नागपूर - क्‍लाऊड सेव्हन बारच्या मालकावर केलेल्या जीवघेणा हल्ल्याप्रकरणी आमदार कृष्णा खोपडे यांची दोन्ही मुले आणि इतर आरोपींनी नियमित जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला. या प्रकरणी मंगळवारी (ता. 20) न्यायालयाने आमदारपुत्रांसह सर्व आरोपींना 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर सशर्त जामीन मंजूर केला.

अभिलाष खोपडे, रोहित खोपडे, मोहसीन खेडेकर, स्वप्नील देशमुख, अक्षय लोंढे, राहुल यादव, गिरीश गिरीधर अशी आरोपींची नावे आहेत. क्‍लाऊड सेव्हन बारमध्ये बिलावरून त्यांचा वेटर व मालकासोबत वाद झाला होता. अभिलाष व त्याच्या मित्रांनी मालक सन्नी ऊर्फ सावन बम्रतवार याच्या डोक्‍यावर दारूची बॉटल फोडली, असा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे तत्काळ सर्व आरोपींनी हायकोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज केला आहे. अर्जामध्ये नियमित जामीन मिळावा, अशी विनंती करण्यात आली आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अंतरिम आदेशाची मागणी करण्यात आलेली नाही. आज सर्व आरोपींच्या जामीन अर्जावर संयुक्त सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान आरोपीपक्षाने वैद्यकीय अहवाल सादर करत बारमालकाच्या डोक्‍याला झालेली इजा गंभीर स्वरूपाची नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

वैद्यकीय अहवाल तसेच एफआयआरमधील काही त्रुटी लक्षात घेत न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला. मात्र, आरोपींना प्रत्येक एक दिवसाआड पोलिस स्टेशनला हजेरी लावावी लागणार आहे. तसेच सर्व आरोपींची बुधवारी (ता. 21) ओळख परेड होईल. सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे आणि सहाय्यक सरकारी वकील नीरज जावडे तर आरोपींतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर, ऍड. राजेश तिवारी, ऍड. उदय डबले, ऍड. प्रकाश जयस्वाल, ऍड. निखिल गायकवाड यांनी बाजू मांडली.

Web Title: MLA sons conditional bail