Vidhan Sabha 2019 : भाजपला झटका; विद्यमान आमदाराचे तिकीट नाकारल्याने बंडखोरी?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

- आमदार राजू तोडसाम बंडखोरीच्या मार्गावर
- केळापूर-आर्णी मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज

यवतमाळ : भारतीय जनता पक्षाने मंगळवारी (ता. एक) जाहीर केलेल्या पहिल्याच यादीतून नाव बाद झाल्यामुळे केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम नाराज झाले असून ते अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याची चर्चा सर्वत्र ऐकू येत आहे. याबाबत त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत पक्षाने न्याय न दिल्याने आता आपले अस्तित्व सिद्ध करून दाखविणार असल्याचे सांगितले आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात सातपैकी भाजपचे पाच आमदार होते. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पाचपैकी चार विधानसभांमधील उमेदवार जाहीर केले. तर, उमरखेड विधानसभेतील उमेदवारांस प्रतीक्षा यादीत ठेवले. या मतदारसंघावर भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रिपाइं (आठवले) गटाने दावा केल्याने येथील निर्णय तुर्तास राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येथील विद्यमान आमदार राजेंद्र नरजधने यांच्या उमेदवारीवर गदा येते की काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

रिपाइंचे महेंद्र भवरे यांनी या मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. तर, यवतमाळ विधानसभेतून विद्यमान आमदार मदन येरावार, वणीतून संजीवरेड्डी बोदकुरवार, राळेगावमधून प्राचार्य डॉ. अशोक उईके आदींची उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु, केळापूर-आर्णी या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने विद्यमान आमदार राजू तोडसाम यांचा पत्ता कट झाला आहे.

आमदार तोडसाम प्रचंड नाराज झाले असून त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतल्याने या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला ही बाब त्रासदायक होणार आहे. त्यासाठी पक्षीय पातळीवर आमदार तोडसाम यांना कसे शांत करता येते यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Todsam may contest independent in assembly election