आमदारांनी ओतले अंगावर केरोसीन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

अमरावती - तुरीचे थकीत चुकारे तातडीने द्यावे व घरात पडून असलेली तूर खरेदी करावी, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेसने जिल्हाकचेरीसमोर सोमवारी (ता. चार) तूर फेकून आत्मदहन आंदोलन केले. दोन आमदारांसह चार कार्यकर्त्यांनी अंगावर केरोसीन ओतले. पोलिसांनी दीडशे कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करत नंतर त्यांची सुटका केली.

जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उपाख्य बबलू देशमुख, आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, आमदार ॲड. यशोमती ठाकूर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते सकाळी ११.३० वाजता जिल्हा परिषदेतून निघून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोचले. या वेळी सरकारविरोधी घोषणा दिल्या. जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्रीराम नेहर, मोहन सिंगवी, अग्रवाल यांच्या पाठोपाठ दोन्ही आमदारांसह जिल्हा परिषद अध्यक्षांनी बाटलीतील केरोसीन अंगावर घेतले. त्यामुळे पोलिसांनी लगेच स्थानबद्धतेची कारवाई करून आंदोलकांना अडवून ठेवले. 

स्थानबद्ध कार्यकर्त्यांना ठेवलेल्या वसंत हॉलसमोर युवक काँग्रेसने रास्ता रोको आंदोलनाचा प्रयत्न केला. तेथून मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष सागर कलाने तसेच आंदोलनस्थळाहून श्रीराम नेहर यांना तपासणीसाठी नेण्यात आले. 

आमदार रवी राणा यांनी वसंत हॉलमध्ये आमदारांची भेट घेतली. तिवस्याचे नगराध्यक्ष वैभव वानखडे, जि.प. सदस्य अलका देशमुख, प्रकाश साबळे, गिरीश कराळे, छाया दंडाळे, माजी सदस्य हरिभाऊ मोहोड या आंदोलनात सहभागी झालेत.

पालकमंत्र्यांनीच आमदारांना आंदोलन करण्यास लावले. ते पालकमंत्री नव्हे बालकमंत्री वाटतात. तुरीच्या खरेदीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. तुरीचे हमीभाव व बाजारभाव यांतील तफावतीची रक्कम शेतकऱ्यांना देण्यावर विचार सुरू आहे.
- रवी राणा, आमदार

Web Title: mla yashomati thakur kerosene agitation tur