आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

आमदार बोंडेंवर आगपाखड 
यशोमती ठाकूर यांनी रुद्रावतार धारण करीत जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर हे आमदार बोंडेंचे नातलग आहेत. जिल्हाधिका-यांनी आदेश दिल्यानंतरही आमदार बोंडे यांनी राजकारण करीत पाणी न सोडण्यास सांगितल्याने लांडेकर यांनी जिल्हाधिका-यांचे आदेश न पाळता नातलगांचे आदेश पाळले असा आरोप करीत लांडेकरांच्या निलंबनाची मागणी केली.

अमरावती : अप्पर वर्धा धरणातून तिवसा तालुक्यातील तहानलेल्या गावांसाठी नदीत पाणी सोडण्याचा मुद्दा चांगलाच पेटला. जिल्हाधिका-यांनी आदेश दिल्यानंतरही पाणी सोडण्यात न आल्याने युद्ध पेटले. तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यासाठी सोमवारी जलसंपदा विभागात प्रचंड आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार व आमदार रणजित कांबळे यांनी त्यांना साथ दिल्याने मुद्दा चांगलाच तापला. अखेर तत्काळ पाणी सोडण्यात येणार असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्यानंतर खडाजंगी थांबली.

तिवसा तालुक्यातील २९ गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. पाण्यासाठी त्राहीत्राही माजली असताना जिल्हाधिका-यांनी रविवारी (ता.१२) रात्री १२ नंतर धरणांतून नदीत पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागास दिले. त्यासाठी नदीकाठावरील गावांत दवंडीही पिटण्यात आली. मात्र पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार यशोमती ठाकूर यांनी सोमवारी (ता.१३) जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासमवेत उपोषणास सुरवात केली.

दरम्यान, पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यालयात बैठक घेत नियोजनावर चर्चा सुरू केली. या बैठकीस नंतर आमदार यशोमती ठाकूर यांनाही निमंत्रित करण्यात आले. ही बैठक चांगलीच तापली. या बैठकीस माजी राज्यमंत्री व काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार, आमदार रणजित कांबळे, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार डॉ. सुनील देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान रुद्रावतार धारण केलेल्या यशोमती ठाकूर चांगल्याच संतप्त झाल्या. त्यांनी मुख्य अभियंता श्री. लांडेकर यांची चांगलीच खरडपट्टी काढली. वातावरण तापत असताना आमदार कांबळे यांनी मध्यस्थी करीत श्री. लांडेकर यांना तासले. पालकमंत्री पोटे यांनी अखेर पाणी सोडण्यास सांगून बैठक आटोपती घेतली.

पोटेंना कांबळेंकडून धडे
जिल्हाधिका-यांनी आदेश दिले असले तरी माझी बैठक व्हायची होती, या पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या उत्तरावर आमदार रणजित कांबळे यांनी त्यांना आचारसंहिता लागू असताना सर्व अधिकार जिल्हाधिका-यांना असतात असे सांगितले. टंचाईच्या स्थितीत जिल्हाधिकारी सर्वोच्च असतात, असेही ते म्हणाले.  या उत्तरानंतर मात्र पालकमंत्री पोटे यांनी शांत राहणे पसंत केले.

आमदार बोंडेंवर आगपाखड 
यशोमती ठाकूर यांनी रुद्रावतार धारण करीत जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर हे आमदार बोंडेंचे नातलग आहेत. जिल्हाधिका-यांनी आदेश दिल्यानंतरही आमदार बोंडे यांनी राजकारण करीत पाणी न सोडण्यास सांगितल्याने लांडेकर यांनी जिल्हाधिका-यांचे आदेश न पाळता नातलगांचे आदेश पाळले असा आरोप करीत लांडेकरांच्या निलंबनाची मागणी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Yashomati Thakur targets officers on water issue in Amravati