मॉब लिचिंग, शीख दंगल अन्‌ जय श्रीराम घोषणा

file photo
file photo

नागपूर : अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक यांनी देशात मॉब लिचिंग सुरू असून जय श्रीराम अशा घोषणा देत स्वकीय स्वकीयांवर हल्ले करीत असल्याचे सांगितले. यावर भाजप सदस्यांनी सभागृहात जय श्रीराम अशा घोषणा दिल्या, यावर गुडधे यांनी सदस्यांची लाज काढली. गुडधे यांच्या भाषणाचा खरपूस समाचार घेत दयाशंकर तिवारी यांनी देशाच्या इतिहासात हिंदू-मुस्लिम दंगलीसाठी कॉंग्रेसला जबाबदार धरत पलटवार केला. अर्थसंकल्पावर चर्चेदरम्यान प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी देशात मॉब लिचिंगचे प्रकार सुरू असून यावर नियंत्रणाचा संकल्प अर्थसंकल्पात केला असता तर संयुक्तिक झाले असते, असे सांगितले. देशात मुस्लिम, दलितांना जय श्रीराम अशा घोषणा देत संपविण्यात येत आहे. यावर सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. यावर संतप्त होऊन गुडधे यांनी "लाज वाटायला पाहिजे, यांना देव सद्‌बुद्धी देवो' अशी जहरी टीका केली. यावर संदीप जोशी यांनी गरज नसताना मॉब लिचिंगचा विषय छेडल्याने यावर विशेष सभागृह घ्यावे, त्यात पुराव्यासह बोलावे, असे आव्हान गुडधे यांना दिले. 1984 मध्ये शीख दंगल घडविल्याचा आरोप जोशी यांनी केला. गुडधे यांनी शीख दंगलीबाबत कॉंग्रेसने तसेच सामील नेत्यांनीही माफी मागितल्याचे नमूद केले. गुडधे यांच्या भाषणानंतर ज्येष्ठ भाजप नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी मॉब लिचिंग, दलित, मुस्लिम यावर कॉंग्रेस किती वर्षे काढणार? असा टोला गुडधे यांना लावला. निवडणूक येताच कॉंग्रेस मुस्लिमांना संकटात टाकते, अशी अनेक उदाहरणे असल्याचेही तिवारी म्हणाले. देशाच्या इतिहासात हिंदू-मुस्लिम दंगी झाल्या, त्यात कोण गुन्हेगार आहे? हे तपासून पाहा, असे आवाहन त्यांनी केले.
महात्मा गांधी यांच्यावरून वाक्‌युद्ध
गुडधे पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त अर्थसंकल्पात कुठलीही तरतूद नाही, यासाठी आभार मानत सत्ताधाऱ्यांना डिवचले. महात्मा गांधी तुमच्या मुखात शोभत नाही, त्यांचे विचार तुम्हाला पटत नाही. तुमच्या विचारात गोडसे आहे, हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले, अशा शब्दात गुडधे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला केला. यावर दयाशंकर तिवारी यांनी केंद्रात कॉंग्रेस सरकार असताना सर्व योजनांना इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, संजय गांधी, राजीव गांधी यांचे नाव दिले, तुम्ही काय आम्हाला महात्मा गांधी सांगणार? असा तिखट सवाल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com