चोराने केला मोबाईल बॅटऱ्यांवर हात साफ

mobile
mobile

यवतमाळ : मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून सहा लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (ता.27) एलसीबीच्या पथकाने आर्णी-महागाव ते दिग्रस टी पॉइंटवर केली.

शेख इमरान शेख इसमाईल (रा. मुबारकनगर, आर्णी) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. मागील काही महिन्यांत जिल्ह्यात मोबाईल टॉवर बॅटऱ्या चोरीच्या घटना घडल्या होत्या. या पथकाने यापूर्वी टॉवर बॅटरी चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड करून दहा गुन्हे उघडकीस आणले होते. शेख इमरान हा बॅटऱ्या घेऊन वाहनाने दिग्रस ते आर्णी रोडवर येणार असल्याची टीप पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला. संशयित वाहनाची झडती घेतली असता, मुद्देमाल मिळून आला. चोरट्याने येरमल हेटी, सदोबा सावळी येथून प्रत्येकी 24 नग, अशा 48 बॅटऱ्या चोरीची कबुली दिली.

या बॅटऱ्या आर्णी येथील शेख अहेमद शेक सादिक याच्या भंगार दुकानात विकले असून, या गुन्ह्यात शेख आसिफ, शेख जुबेर सोबत होते, असे सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक नीलेश शेळके, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, गजानन डोंगरे, गोपाल वास्टर, पंकज पातूरकर, मुन्ना आडे, कविश पाळेकर, किशोर झेंडेकर, मो. ताज, नागेश वास्टर, पंकज बेले आदींनी केली.

डेहणीचा चोरीचा डाव फसला
शेख इसमाईल याने रविवारी डेहणी येथे टॉवर बॅटरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आलाराम वाजल्याने चोरीचा डाव फसला. यावेळी शेख आसिफ व शेख जुबेर सोबत होते, अशीही कबुली पोलिसांना दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com