देवदर्शनाला गेलेल्या नगरसेवकांचे मोबाईल ठेकेदाराच्या घरी...!

संदीप रायपुरे
शुक्रवार, 13 जुलै 2018

विरोधक मत फोडण्याचे प्रयत्न करतील, याची पुरेपुर जाणीव असल्याने त्यांनी नगरसेवकांचे भ्रमणध्वनी आपल्याकडे ठेवले आणि त्यांना देवदर्शनाला पाठविले. याची माहिती मिळताच स्वस्थ बसलेले भाजप नेते जागे झाले. 

गोंडपिपरी : येत्या काही दिवसांत गोंडपिपरी नगराध्यक्षाची निवडणूक होत आहे. याची पूर्वतयारी म्हणून बहुमताचा आकडा पार करत काँग्रेस, शिवसेना व अपक्ष नगरसेवकांची मोट बांधत देवदर्शनाला पाठविण्यात आले. शिताफीने जुळविलेली मते फुटू नयेत, यासाठी देवदर्शनाला गेलेल्या नगरसेवकांचे भ्रमणध्वनी या कामात मोट बांधणाऱ्या ठेकेदाराने स्वतःच्या घरीच ठेवली आहेत. याची रंगतदार चर्चा सुरू आहे.

दुसरीकडे एक मत कमी असल्याने सत्ताधारी भाजपमध्ये अस्वस्थता आहे. देवदर्शनाला गेलेल्या नगरसेवकांसोबत संपर्क होत नसल्याने भाजपमध्ये धाकधूक आहे. भाजपसोबत सत्तेत असलेल्या अपक्ष नगरसेवकाने पारडे बदलल्याने दबावतंत्रासाठी त्यांच्या भावाच्या स्वस्त धान्य दुकानाच्या तक्रारींवर तक्रारी करण्यात येत आहेत.

या निवडणुकीच्या माध्यमातून राजुरा विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी आमदार आमनेसामने आहेत. त्यामुळे ही निवडणूक आणखीणच रंगतदार बनली आहे. येत्या काही दिवसांत गोंडपिपरी नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे.

7 अपक्ष, 6 भाजप, 3 काँग्रेस आणि एक शिवसेना असे पक्षीय बलाबल आहे. अशातच अपक्षांना घेत भाजपने गोंडपिपरी नगरपंचायतींवर झेंडा रोवला होता. आता अडीच वर्षांनंतर पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना अध्यक्षपदाची स्वप्न पडू लागली आहेत.

येथील प्रसिद्ध कंत्राटदार रवी साखलवार यांची भावसून सपना साखलवार या अपक्ष नगरसेविका आहेत. त्यांनी यापूर्वी भाजपला पाठिंबा दिला होता. पण यावेळी भावसुनेला अध्यक्ष बनविण्यासाठी रवी साखलवार या़नी कंबर कसली आहे. त्यांनी माजी आमदार सुभाष धोटे यांच्याशी समन्वय साधून काँग्रेस, अपक्ष व शिवसेनेच्या नगरसेवकांची मोट बांधली व बहुमत जुळवत नगरसेवकांना देवदर्शनाला पाठविले.

विरोधक मत फोडण्याचे प्रयत्न करतील, याची पुरेपुर जाणीव असल्याने त्यांनी नगरसेवकांचे भ्रमणध्वनी आपल्याकडे ठेवले आणि त्यांना देवदर्शनाला पाठविले. याची माहिती मिळताच स्वस्थ बसलेले भाजप नेते जागे झाले. भाजपचे 6  आणि अपक्ष 2 असे 8 नगरसेवक त्यांच्याकडे आहेत. पण बहुमतासाठी 9 नगरसेवकांची आवश्यकता आहे. अशात अपक्ष नगरसेवक प्रविण नरहरशेट्टीवार यांच्या भावाच्या स्वस्त धान्य दुकानाच्या भरमसाठ तक्रारी करून दबावाचा प्रयोग केला जात आहे.

एका नगरसेवकाला सांभाळू न शकणाऱ्या नगरपंचायतीच्या पक्षनेतृत्वावर केंद्रीयमंत्री हसंराज अहिर यांनी बैठकीत उघड नाराजी दर्शविली. या निवडणुकीच्या माध्यमातून आमदार संजय धोटे, काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे आमनेसामने आहेत. या निवडणुकीत शेवटपर्यंत काय घडामोडी घडतात याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Web Title: The mobile Phone are in contractor house