सिमेंटच्या जंगलामुळे लोप पावला व्यवसाय, कारखाने बंद, आता उरल्या केवळ आठवणी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

डोक्‍यावर हक्काचा निवारा म्हणून काही वर्षांपूर्वी कवेलूचाच वापर केला जात होता. मात्र, बांधकाम क्षेत्रात बदल झाले आणि डोक्‍यावर आता सिमेंट कॉंक्रिटचा निवारा आला. केवळ शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही आता घरांचे सिमेंटीकरण झाले आहे.

चंद्रपूर : स्वातंत्र्योत्तर व स्वातंत्र्यपूर्व काळात महत्त्वपूर्ण समजला जाणारा कवेलू व्यवसाय आधुनिकीकरणामुळे आजघडीला डबघाईस आला आहे. जिल्ह्यातील जवळपास 40 उद्योग बंद पडले आहेत. सध्या अस्तित्वातील दोन कारखान्यांनासुद्धा कुलूप लागले आहे. सिमेंटीकरणाचा मोठा फटका या उद्योगांना बसला आहे. कवेलू उद्योग बंद झाल्याने येथे काम करणारे कामगार बेरोजगार तर झालेच शिवाय दरवर्षी पावसाळ्यात घर शाकारणीसाठी येणारे कामगारही आता दिसेनासे झाले आहेत. 

डोक्‍यावर हक्काचा निवारा म्हणून काही वर्षांपूर्वी कवेलूचाच वापर केला जात होता. मात्र, बांधकाम क्षेत्रात बदल झाले आणि डोक्‍यावर आता सिमेंट कॉंक्रिटचा निवारा आला. केवळ शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही आता घरांचे सिमेंटीकरण झाले आहे. परिणामी, कवेलू उद्योगाला याचा मोठा फटका बसला आहे. 

घरांच्या छतावरून कवेलू बेपत्ता झाले असले, तरी घरांचे सौंदर्य वाढविण्यासाठी सिमेंट कॉंक्रिटवर ते आजही लावले जातात. गावखेड्यात अद्यापही मोठ्या संख्येत कौलारू घरे आहेत. मात्र, त्याच्या जागेवरही आता टिनाची पत्रे दिसायला लागली आहेत. परिणामी, दिवसेंदिवस कवेलूची मागणी कमी होत आहे. जिल्ह्यात सुमारे कवेलुचे 40 कारखाने होते. या ठिकाणी कामगार मोठ्या संख्येने काम करीत होते. 

हेही वाचा - खाकी वर्दीतील लव्हबर्डची चर्चा जोरात, वरिष्ठांपर्यंत पोहोचले प्रकरण अन्...

पावसाळ्याच्या सुरुवातील कवेलूचे घर शाकारले जायचे. दोनमजली घरावर चढून कवेलू व्यवस्थित करण्याचे करण्याचे कसब काही काहींनाच जमायचे. पावसाळ्याच्या तोंडावर या कारागिरांना खूप मागणी असायची. परंतु आता कवेलूची घरे नाही, कारखानेही नाहीत. त्यामुळे शाकारणीचा प्रश्‍नच नसल्याचे हे कामगारही दिसेनासे झाले आहेत. 

चंद्रपुरात मुख्यत: मॉर्डन, चव्हाण, मामीडवार, महावीर, कोठारी, बागला, कुंभार सोसायटी, दादाभाई पॉटरिज या व्यावसायिकांचे कवेलू कारखाने होते. पण, जसजसे बांधकाम क्षेत्रात बदल होत गेले तशी या कारखान्यांनी अखेरची घटका मोजायला सुरुवात केली. चंद्रपुरात 1952 मध्ये चव्हाण कवेलू कारखाना सुरू झाला. त्यावेळेस कवेलू काढण्याचे काम हाताने करावे लागत होते. कालांतराने कवेलू तयार करण्याच्या मशीनचा शोध लागला. त्यानंतर हा व्यवसाय चांगलाच तेजीत आला. परंतु, या क्षेत्रात झपाट्याने बदल झाल्याने कवेलू उद्योगांना कायमचे कुलूप लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In modernization, Kavelu's business was locked up