डाॅ. भागवत म्हणाले, संघाच्या बदनामीचा मार्ग इम्रान खान यांना अवगत

डाॅ. भागवत म्हणाले, संघाच्या बदनामीचा मार्ग  इम्रान खान यांना अवगत

नागपूर : जेथे संघ पोहोचलेला नाही तेथे लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे विरोधक प्रयत्न करीत आहेत. संघ हिंदू समाजाचे संघटन करतो म्हणजे मुस्लिम व ख्रिश्‍चनविरोधी आहे असे होत नाही. संघाचे काम वाढत असल्याचे बघून उपद्रवी लोक विकृत आरोप करीत आहेत. संघाला बदनाम करण्याचा मंत्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनादेखील अवगत असल्याचा घणाघाती प्रहार सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केला. 
संघाच्या विजयादशमी उत्सवात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर एचसीएलचे संस्थापकीय अध्यक्ष शिव नाडर यांच्यासह विदर्भप्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया व सहसंघचालक श्रीधर गाडगे उपस्थित होते. उत्सवाला संबोधित करताना डॉ. मोहन भागवत यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर भाष्य केले. संघाचे नाव नेहमीच मॉब लिंचिंगच्या घटनांशी जोडले जाते. मात्र, या घटनांशी संघाचा काहीही संबंध नाही. हा प्रकार भारतात शक्‍य नाही. भारतात विविधता असूनही लोक शांततेत जगतात. तसे सांगताना येशू ख्रिस्त यांच्या काळातील उदाहरणे त्यांनी दिली व ही संस्कृती पाश्‍चिमात्य असल्याचे सांगितले. 
देशात घडणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना सामुदायिक रंग देणे अयोग्य आहे. त्यांच्या विरोधात कारवाई करावी. जर तेवढा कठोर कायदा नसेल तर नेतृत्वाने तो तयार करावा असे सांगताना भागवत यांनी सत्तेत स्वयंसेवक असेल तर हे त्याचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगितले. याप्रसंगी मोदी सरकारच्या निर्णय क्षमतेचे कौतुक करताना भागवत यांनी देशात साहसी व धाडसी निर्णय घेण्याची धमक असलेले सरकार असल्याचे मत व्यक्‍त केले. लोकशाही व्यवस्था भारतीय परंपरेचा भाग असल्याचेदेखील भागवत म्हणाले. 
यावेळी शिव नाडर यांनी देशातील शैक्षणिक स्थिती बिकट असल्याचे सांगत एचसीएल फाउंडेशनच्या जनजागृतीची माहिती दिली. लहान मुलांपासून ते महाविद्यालयीन गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे नाडर यांनी सांगितले. साक्षरतेच्या प्रमाणात देश मागे पडला असून, शहरी व ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत मोठे अंतर असल्याचे सांगताना उत्तर प्रदेशात एचसीएल फाउंडेशन करीत असलेल्या कार्याची त्यांनी माहिती दिली. शिवाय विकासदर, कुपोषण यासारख्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करून शासनाच्या योजना कुपोषित प्रदेशापर्यंत पोहोचत नसल्याचे दु:ख नाडर यांनी व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे संचालन महानगर शारीरिकप्रमुख रोहन मोहने यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन महानगर संघचालक राजेश लोया यांनी केले. 
कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह उपस्थित होते. तसेच धर्मगुरू, व्यावसायिक, जगातिल प्रसिद्ध समीक्षक व पत्रकारदेखील उपस्थित होते. अरुणाचल येथील 25 बांधवांनी नागरी वेशात उपस्थिती लावली होती. 

मंदीची चर्चा नको 
आर्थिक मंदी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने चांगले काम केले. सरकारने उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे सातत्याने मंदीवर चर्चा करणे योग्य नसल्याचे भागवत म्हणाले. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी विदेशी गुंतवणूक आणि उद्योगांचे खासगीकरण आवश्‍यक असून सरसंघचालकांनी खासगीकरण व एफडीआयचे समर्थन केले. 

चंद्रयानाचे मोहिमेचे स्वागत 
डॉ. भागवत यांनी चंद्रयान मोहिमेचे कौतुक केले. कधीकाळी असाध्य वाटणारी बाब साध्य झाली असल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या कष्टाचेही कौतुक केले. 

प्रथमच मिसाईलचे पूजन 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवान पारंपरिक शस्त्रपूजनाचा कार्यक्रमदेखील संबोधल्या जाते. सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या हस्ते यावर्षी पारंपरिक शस्त्रांच्या पूजनात मिसाईलचेदेखील पूजन केले आहे. 

चिरु वडीचे सादरीकरण 
सांगिक योगासन, काठीलाठी, नियुद्धाचे सादरीकरण हे संघाच्या विजयदशमी उत्सवाचे आकर्षण असते. मात्र संघाने यात अजून एक प्रकार आणला आहे. केरळातील प्रसिद्ध चिरु वडी या काठीलाठीच्या प्रकाराचे सादरीकरण यंदा प्रथमच विजयादशमीच्या उत्सवात स्वयंसेवकांनी सादर केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com