मोहन मते यांची दक्षिणेवर स्वारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

नागपूर : शंभू राजे महानाट्याच्या माध्यमातून "मी येतोय्‌' असे संकेत देणारे माजी आमदार मोहन मते खरोखरच भाजपची उमेदवारी घेऊन दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, फटाके फोडून त्यांनी मते यांचे स्वागत केले. 

नागपूर : शंभू राजे महानाट्याच्या माध्यमातून "मी येतोय्‌' असे संकेत देणारे माजी आमदार मोहन मते खरोखरच भाजपची उमेदवारी घेऊन दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, फटाके फोडून त्यांनी मते यांचे स्वागत केले. 
मोहन मते दक्षिण नागपूरचे माजी आमदार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच महापालिकेतून ते थेट विधानसभेत दाखल झाले होते. महापालिकेच्या स्थायी समितीचे ते अध्यक्षसुद्धा होते. 1999 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या तरुण तुर्कांपैकी विधानसभेत दाखल झालेल्यांमध्ये मते यांचाही समावेश होता. यानंतर त्यांनी दक्षिण नागपूर शिवसेनेसाठी सोडण्यात आल्याने मोहन मते पक्षावर नाराज होते. त्यांनी बंडोखोरीसुद्धा केली होती. अनेक वर्षे ते पक्षाच्या बाहेरच होते. पुन्हा पक्षात आल्यानंतर मोहन मते जोमाने कामास भिडले होते. देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्याने मागील निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्‍यता वर्तविली जात होती. मात्र, ऐनवेळी पक्षाने सुधाकर कोहळे यांच्या पारड्यात उमेदवारी टाकली. मात्र, मोहन मते यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याकडे लक्ष वेधणे सुरू केले. अनेक महिन्यांपासून त्यांनी दक्षिण नागपुरात सांस्कृतिक कार्यक्रमांचा धडाका लावला होता. रेशीमबाग मैदानावर घेतलेल्या शंभू राजे महानाट्याला अलोट गर्दी उसळली होती. या महानाट्यास सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपच्या दिग्गजांनी हजेरी लावली होती. तेव्हापासूनच मोहन मते दक्षिणेत पुन्हा येणार अशी चर्चा सुरू होती. भक्कम मित्रमंडळ आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ ही मोहन मते यांची जमेची बाजू आहे. दक्षिणेतीलच नव्हे तर संपूर्ण शहरात त्यांचे समर्थक आहेत. सर्वच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत त्यांचा दांडगा संपर्क आहे. त्यामुळे भाजपलाही मते यांच्याकडे दुर्लक्ष करता आले नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mohan mate, election