किसनराव हुंडीवाले यांच्या हत्येच्या ठिकाणीच साक्षीदाराची आत्महत्या!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मे 2019

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते तथा प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले यांची सोमवारी हत्या करण्यात आली होती. या घटनेला दोन दिवस उलटून जात नाहीत तोच या कार्यालयात शिपाई या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.९) घडली. विशेष म्हणजे, आत्महत्या केलेला व्यक्ती हुंडीवाले हत्याकांडातील साक्षीदार होता.

अकोला - सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते तथा प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले यांची सोमवारी हत्या करण्यात आली होती. या घटनेला दोन दिवस उलटून जात नाहीत तोच या कार्यालयात शिपाई या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.९) घडली. विशेष म्हणजे, आत्महत्या केलेला व्यक्ती हुंडीवाले हत्याकांडातील साक्षीदार होता.

मोहन दयाराम संकत (वय ५७) हे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात शिपाई या पदावर कार्यरत होते. ज्या दिवशी या कार्यालयात किसनराव हुंडीवाले यांची अग्निरोधक यंत्राचे सिलिंडर (फायर इस्टिंग्यूशर) डोक्‍यात घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या घटनेत ते साक्षीदार असल्याची माहिती आहे. बुधवारी या प्रकरणातील साक्षीदारांची पोलिसांनी विचारपूस केली होती. या आणि अशा अनेक कारणांनी धास्तावून मोहन दयाराम संकत यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आत्महत्या केल्याची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे, विनोद ठाकरे, विलास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. 

कर्मचारी कार्यालयात आलेल्यानंतर घटना उघडकीस
मृतक मोहन दयाराम संकत हे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात शिपाई आणि पुकारा देण्याचे काम करीत होते. ते सकाळी ७ वाजता कार्यालयात येऊन साफसफाईचे काम करीत असत. नेहमीप्रमाणे ते आजही कार्यालयात आले होते. मात्र, सकाळी १०.३० वाजता कार्यालयातील इतर कर्मचारी आले असताना त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला. या घटनास्थळावर मृतक संकत यांची सायकल होती. त्यावर इंग्रजीमध्ये एम.डी. संकत असे नाव लिहलेले होते.

हत्याकांड घडले त्या दिवशी मृतक मोहन संकत हे तिथे उपस्थित होते. त्यांना कोणी तरी धमकी दिली असावी किंवा पोलिसांनी सक्तीने विचारपूस केली असावी या भीतीपोटी त्यांनी आत्महत्या केली असल्याची शक्‍यता आहे. मात्र, पोलिस तपासात काय समोर येते याकडे आमचे लक्ष असणार आहे. 
- अमर डिकाव, मृतकाचे नातेवाईक.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील शिपाई पदावर कार्यरत असलेले मोहन संकत हे हुंडीवाले प्रकरणातील साक्षीदार होते. मात्र, त्यांनी केलेली आत्महत्या ही त्यांच्या पारिवारिक कारणातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेचा तपास केला जाईल.
- एम.राकेश कलासागर, जिल्हा पोलिस अधीक्षक, अकोला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohan Sankat Witness Suicide Crime Murder Case