संस्था सचिवावर विनयभंगाचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

स्व. कमला नेहरू मागासवर्गीय मुलीच्या वसतिगृह अधीक्षकेला संस्थेचे सचिव व जि. प. सदस्य विजय देशमुख व त्यांचा मुलगा सुशील विजय देशमुख यांनी विनयभंग केल्याची तक्रार सावनेर पोलिसात करण्यात आली आहे. या तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सावनेर तालुक्‍यात राजकीय खळबळ माजली आहे.

सावनेर - येथील स्व. कमला नेहरू मागासवर्गीय मुलीच्या वसतिगृह अधीक्षकेला संस्थेचे सचिव व जि. प. सदस्य विजय देशमुख व त्यांचा मुलगा सुशील विजय देशमुख यांनी विनयभंग केल्याची तक्रार सावनेर पोलिसात करण्यात आली आहे. या तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सावनेर तालुक्‍यात राजकीय खळबळ माजली आहे. 

सावनेर येथील स्व. कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह सावनेर खापा रोडवरून डिसेंबर २०१८ मध्ये महात्मा फुले वॉर्डात संस्थेचे सचिव विजय देशमुख यांच्या घरी स्थानांतरित केले. त्यावेळी अधीक्षिकेने वसतिगृहात राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली. ही मागणी मान्य न झाल्याने त्या बाजूला राहू लागल्या. नव्या वसतिगृहात मुलींवर अनेक बंधने लावली. त्यांना विजेचे उपकरणे सुरू करण्यास बंदी होती, याशिवाय निकृष्ट जेवणासह पोळ्या न देणे, मुलीच्या चपला बाहेर फेकणे असे प्रकार समोर आल्याने अधीक्षिकेने स्वयंपाकी महिलेस याबाबत विचारणा केली. मात्र, स्वयंपाकी महिलेने सचिवांच्या घरच्या सदस्यांचे ऐकल्याचे सांगितले. २०१६-१७ या काळात विद्यार्थिनी गैरहजर असल्याने संस्थेला मिळालेल्या  अनुदानातून ३६ हजार रुपये परत करावे लागले. तेव्हापासून विजय देशमुख व अधीक्षिका  यांच्यात वाद सुरू झाला. काही विद्यार्थिनी ऑगस्ट महिन्यापासून गैरहजर होत्या. त्यांची हजरी लावण्याची सूचना देशमुख यांनी दिली. यावरून वाद वाढला. 

बुधवारी (ता.१५) पीडित अधीक्षकेसोबत वाद घालून विजय देशमुख व सुशील देशमुख यांनी विनयभंग केला. अशी तक्रार सावनेर पोलिसात पीडितेने केली. यावर सावनेर पोलिसांनी कारवाई केली असून आरोपी विजय भाऊराव देशमुख व सुशील विजय देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

हे प्रकरण खोटे असून अधीक्षिकेने लावलेले आरोप निराधार आहेत. ते पुढील चौकशीत पुढे येईल. यापूर्वी पंचशीलनगर येथे हे वसतिगृह होते. त्या ठिकाणी अधीक्षिकेच्या मनमर्जीचा कारभार चालायचा. परंतु, वसतिगृह हलविण्यात आले. या ठिकाणी माझे वास्तव्य असल्याने  अधीक्षिकेच्या कारभारावर पाळत वाढली. गैरप्रकारावर अधीक्षकेला स्मरणपत्रेही देण्यात आले आहेत. 
- विजय देशमुख, सचिव, स्व. कमला नेहरू मागासवर्गीय मुलीचे वसतिगृह 

अधीक्षकेच्या तक्रारीच्या आधारावर संस्था सचिव व अधीक्षिकेची मंगळवारला सुनावणी घेण्यात आली  सचिव अनुपस्थित होते २८ मे रोजी अंतिम सुनावणीची तारीख आहे यामध्ये संस्थाचालक दोषी आढळल्यास तत्काळ मान्यता रद्दचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविण्यात येईल.
- सुकेशिनी तेलगोटे, समाजकल्याण अधिकारी, जि .प. नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Molestation Crime on Secretory