पैसा गेला मातीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

अमरावती : यंदा पावसाने शेतकऱ्यांची कंबर मोडली. दिवाळीपूर्वी दोन पैसे हातात देणारे सोयाबीनचे पीक पाण्यामुळे उद्‌ध्वस्त झाल्याने शेतकरी अधिकच चिंतेत पडला असून ओला दुष्काळ त्याच्या डोळ्यात पाणी आणत असल्याचे दिसत आहे. सूर्यप्रकाश मिळत नसल्याने कपाशीची बोंड फुटायला वेळ लागत आहे. 

अमरावती : यंदा पावसाने शेतकऱ्यांची कंबर मोडली. दिवाळीपूर्वी दोन पैसे हातात देणारे सोयाबीनचे पीक पाण्यामुळे उद्‌ध्वस्त झाल्याने शेतकरी अधिकच चिंतेत पडला असून ओला दुष्काळ त्याच्या डोळ्यात पाणी आणत असल्याचे दिसत आहे. सूर्यप्रकाश मिळत नसल्याने कपाशीची बोंड फुटायला वेळ लागत आहे. 
गेल्या तीन महिन्यांपासून सतत पाऊस पडला. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने सोयाबीनमध्ये तण वाढत गेले. थोडीफार पावसाने उसंत दिली की शेतकऱ्यांनी सोयाबीनमधील वाढलेले तण कापून काढले. पहिल्यावेळी तण कापले की पुन्हा पाऊस पडला की तण जैसे थे वाढत गेले. त्यामुळे यंदा शेतकऱ्याला सोयाबीनला मोठ्याप्रमाणात खर्च आला. सोयाबीन काढणीला आले असता पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी करून गंजी लावली असता त्या गंजीतच सोयाबीनच्या दाण्याला कोंब फुटले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परतीच्या पावसाने पुन्हा कहर केल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन कापणी करायचे राहिले त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अद्याप 90 टक्‍के शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात उभे आहे. दिवाळी पूर्वी येणारे नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने बऱ्याच शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. आता सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन कापणी दिवाळीनंतर होत आहे. त्यामुळे मजुरांची कमतरता भासणार आहे. कपाशीचे पीक कसेबसे दोन पैसे हातात देईल, अशा आशेवर शेतकरी आहे. परंतु यापूर्वीच पडलेल्या पावसामुळे जमिन ओली असल्याने शेतकऱ्यांना डवऱ्याचे फेर मारायला वेळ मिळाला नाही. आता पावसाचे प्रमाण जास्त झाले असले तरी कपाशीला बोंडाची संख्या बऱ्यापैकी आहे. परंतु बोंड फुटण्यासाठी सूर्यप्रकाशाची आता गरज आहे. सूर्य जोपर्यंत चांगले तापणार नाही तोपर्यंत कपाशीचे बोंड फुटून कापूस शेतकऱ्यांच्या डोळ्याने दिसणार नाही. त्यामुळे कापसाचे पीक हातात येते की नाही अशा चिंतेत शेतकरी सापडला आहे. 

यंदा ओला दुष्काळ 
यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मूग, उडीद, तूर, सोयाबीन व कपाशी अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे यंदा ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी प्रदीप पाटील यांनी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Money goes to the soil