#Bad News मरणही झाले खर्चिक! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

  • घाटांवर सरणासाठी द्यावे लागतात अडीच हजार रुपये 
  • पैसे नसल्यास लाकडे देण्यास नकार 
  • महागाईचा मरणानंतरही माणसाचा पाठलाग कायम 
  • नगरसेवकांचे पत्रही ग्राह्य धरले जात नाही 

नागपूर : जीवन जगण्यासाठी माणसाला आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. मोठा खर्च करावा लागतो. आपल्या, कुटुंबाच्या सुखी आयुष्यासाठी त्याची धडपड सुरू असते. यासाठी तो नानाविध कार्य करीत असतो. नोकरी, व्यवसाय, मजुरी आदी कामे करून संसाराचा गाढा हाकत असतो. सुखी आयुष्यासाठी त्याचे सतत प्रयत्न सुरू असते. संपूर्ण आयुष्य खर्ची घातल्यानंतर उतारवयात तरी चांगले जीवन मिळावे, ही त्याची अपेक्षा असते. 

एक ना एक दिवस प्रत्येकाला मरायचे आहे, हे अटळ सत्य आहे. यापासून आजवर कुणीही वाचलेला नाही. जिवण्याच्या शेवटी अंत्यसंस्कार पूर्ण सोपस्काराने पार पडावी ही प्रत्येकाची इच्छा असते. श्रीमंत व्यक्‍तींना याची काहीही काळजी नाही. मात्र, गरिबांचे काय? ज्यांचे जीवनच संघर्षात गेले ते काय करणार? हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे हाल अजूनच बेकार होते. ज्यांना रोजच्या जेवणाची व्यवस्था त्याच दिवशी करावी लागते ते शेवटचा विचार करणार तरी कसे. 

दहन घाटावर आल्यानंतर मृतदेह जाळण्यासाठी लागणारे लाकूड नि:शुल्क दिले जाते. मात्र, महापालिकेच्या घाटांवर आता अडीच हजार रुपये शुल्क आकारणी करण्यात येत आहे. पैसे दिल्यावरच घाटावर लाकडे मिळत असल्याने ज्यांच्याकडे पैसे नाही, अशा गरिबांनी काय करावे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पूर्वी नैतिक जबाबदारीसह महानगरपालिकेकडून ही व्यवस्था मोफत होती. आता मात्र महानगरपालिकेने हात झटकल्याचे अधोरेखित झाले आहे. 

शहरात अंबाझरी, मोक्षधाम, गंगाबाई, वैशालीनगर, मानेवाडा, सहकारनगर, पारडी आदी प्रमुख घाट आहेत. या घाटांवर रोज शेकडो लोकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. काहींचा दफनविधी तर काहींवर मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात येते. अग्नीसाठी घाटांवर लाकडे उपलब्ध आहेत. ही लाकडे पुरवठा करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. यासाठी त्यांच्याकडून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येते. 

महानगरपालिकेकडून साडेसात मन लाकडाची व्यवस्था मोफत करण्यात आली होती. गेली अनेक वर्षे ही व्यवस्था मोफत होती. यासाठी महानगरपालिकेचे मोठं कौतुकही झाले. मात्र, आता यासाठी पैशाची मागणी होत आहे. यावरून मरणानंतरही महागाईने माणसाचा पाठलाग कायम ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

गरिबांनी अंत्यसंस्कार करूच नये काय?

अंबाझरी घाटानंतर आता सर्वच घाटांवर पैशाची मागणी होत आहे. प्रत्येकाला दोन हजार 530 रुपयांची आकारणी करण्यात येत आहे. गरिबांसाठी ही रक्कम फारच मोठी आहे. अनेकांचा पगारच या रकमेच्या दुपटीच्या घरात आहे. यामुळे गरिबांची मोठी कोंडी होत आहे. विशेष म्हणजे नगरसेवकांचे पत्रही ग्राह्य धरले जात नाही. त्यामुळे गरिबांनी अंत्यसंस्कार करूच नये काय? असाच सवाल उपस्थित होत आहे. 

मरणाच्या पैशातून भरणार मनपा तिजोरी?

महानगरपालिकेची आर्थिक स्थिती खराब आहे. पैसा नसल्याने अनेक कामांवर परिणाम होत आहे. घाटांवरील लाकडाचा भार महानगरपालिका उचलते. हा भार कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची चर्चा आता घाटांवर रंगली आहे. मरणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून घेण्यात येणारी रक्कम तुलनेत जास्त असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मरणाच्या पैशातून महापालिका आपली तिजोरी भरत असल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे. 

 


डॉ. सुनील कांबळे

सर्वच घाटांवर आकारणी 
महापालिकेने घाटांवर शुल्क आकारणी सुरू केली आहे. त्यानुसार वेगवेगळ्या घाटांवर दर आकरण्यात येत आहे. 
- डॉ. सुनील कांबळे, 
आरोग्य विभाग, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Money has to be paid on the ghat