सावकाराने कर्जासाठी पेटवून दिलेल्या महिलेची झुंज अखेर अपयशी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

लग्नाच्या वाढदिवशीच दुर्दैवी घटना
हरिश्‍चंद्र आणि कल्पना हरिणखेडे यांचा सात मे हा लग्नाचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्याची तयारी त्यांनी केली होती. परंतु भाटियाच्या रूपाने त्यांच्यासमोर काळ उभा राहिला. त्याने पेटवून दिले आणि लग्नाच्या दिवशीच कल्पना मृत्यूच्या छायेत गेली. सात दिवस तिने मृत्यूशी झुंज दिली.

चंद्रपूर - कर्जाचे पैसे परत दिले नाहीत म्हणून एका सावकाराने कर्जदाराच्या पत्नी आणि मुलाला पेटवून दिले. सात दिवसांनंतर आगीत होरपळलेल्या पत्नीचा नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (ता. १४) मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी जसबीर भाटिया याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. 

सरकारनगरातील हरिश्‍चंद्र हरिणखेडे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांनी शहरातील जसबीर भाटिया ऊर्फ सोनू यांच्याकडून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यातील दोन लाख रुपयांची परतफेड त्यांनी केली होती. उर्वरित रकमेतील ६० हजार रुपये सात मे रोजी देण्याचे ठरले. ते घेण्यासाठी भाटिया त्यांच्या घरी गेला. मुलगा पीयूष आणि पत्नी कल्पना घरी होते. कर्जाची रक्कम देण्यावरून वाद झाला. जसबीरने गाडीत ठेवलेले पेट्रोल पीयूष आणि कल्पना यांच्यावर शिंपडले आणि त्यांना पेटवून दिले. यात जसबीरही किरकोळ भाजला. शेजारचे धावून आले आणि त्यांनी या दोघांना वाचविले. मायलेकांना चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कल्पना जवळपास ६० टक्के जळाली होती. त्यानंतर तिला नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी (ता. १४) तिचा मृत्यू झाला.

Web Title: Money lender Fire Women Death Crime