माकडीणचे बाळंतपण लक्‍झरी बसमध्ये!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

दर्यापूर (अमरावती) : पृथ्वीतलावर प्रत्येकच मादीला बाळंतपणाकरिता सुरक्षित वातावरणाची गरज असते; मग मनुष्य असो वा जनावर. सुरक्षितता नसल्यास योग्य त्या पर्यायी जागेचा शोध घेतला जातो. अशीच सुरक्षेची जागा शोधून एका माकडीने बाळंत होत गोंडस पिलाला जन्म दिला.

दर्यापूर (अमरावती) : पृथ्वीतलावर प्रत्येकच मादीला बाळंतपणाकरिता सुरक्षित वातावरणाची गरज असते; मग मनुष्य असो वा जनावर. सुरक्षितता नसल्यास योग्य त्या पर्यायी जागेचा शोध घेतला जातो. अशीच सुरक्षेची जागा शोधून एका माकडीने बाळंत होत गोंडस पिलाला जन्म दिला.
दर्यापूर येथे एसटी बसस्टण्डजवळ जुन्या भंगार लक्‍झरी बस उभ्या आहेत. या बसचा ताबा आठवड्यापासून माकडांच्या कळपांनी घेतला. येथेच राहणे, उनाडक्‍या करणे, मिळेल ते खाणे असा त्यांचा दिनक्रम सुरू होता. रात्री याच बसमधील आरामदेही सीटवर यथेच्छ झोपसुद्धा माकडांनी घेतली. या बसच्या काचा फुटलेल्या असल्याने जाण्यायेण्याचा कुठलाच त्रास नाही. कुणी हुसकावून लावणारेही नाही. याचा पुरेपूर फायदा या माकडांनी घेतला. याच कळपात एक माकडी गरोदर होती. मातृत्वाच्या चाहुलीने गदगदित झालेली ही माकडी पुढे येणाऱ्या बाळंतपणाकरिता सुरक्षित जागा शोधू लागली. ऊन, वारा, पावसापासून आपल्या बाळाचे संगोपन करण्यात ती विचारमग्न होती. त्यातच आयत्या लक्‍झरी बसपेक्षा सुरक्षित ठिकाण ते कोणते असणार, असा विचार करत तेथेच बाळाला जन्म देण्याचा विचार पक्का झाला. शिवाय सुरक्षेकरिता कळप आहेच. दिवस पूर्ण होताच माकडीला बाळंतपणाची चाहूल लागली आणि सुंदर, निरागस व गोंडस पिलाला तिने जन्म दिला. एव्हाना लक्‍झरी बसमध्ये जन्म घेणारे हे बहुधा एकमेव पिलू असावे.
तीनचार दिवसांत त्या पिलाने बसमध्येच आईच्या सहवासात उनाडक्‍या करणे सुरू केले. सर्वच माकडांचा कळप आसपास असल्याने सुरक्षेची चिंता नव्हती. मात्र गावठी कुत्र्यांना याचा सुगावा लागताच त्यांचे लक्‍झरी बसभोवताल चकरा सुरू झाल्या. कुत्र्यांच्या भीतीने भयभीत झालेल्या माकडांनी बसच्या छताचा आधार घेतला. त्यामुळे त्यांच्यापुढे या गावठी कुत्र्यांचे काहीएक चालले नाही. आरामदेही बसमध्ये जन्मलेल्या या पिलाच्या कुतूहलाचा विषय समस्त दर्यापुरात चर्चेचा झाला.

Web Title: monkey delivery news