रात्रीच झाला आईचा मृत्यू, तरीही सकाळपर्यंत चिकटून बसले होते पिल्लू

आनंद चिठोरे | Wednesday, 4 November 2020

पथ्रोट परिसरात पशूप्रेमी म्हणून प्रसिद्ध व पेशाने शिक्षक असलेले रितेश नवले हे मंगळवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे शिंदी रस्त्यावर फिरायला गेले असता त्यांना एक माकड व तिचे लहान पिलू कुत्र्यांच्या तावडीत सापडलेले दिसले.

पथ्रोट (जि. अमरावती ) : मनुष्य असो की प्राणी आईच्या मायेचे स्थान अनन्यसाधारण आहे. हे एका घटनेने पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. पशूप्रेमींनी माकडाच्या पिलाची केलेली देखभाल ही वाखाणण्याजोगी ठरली. 

हेही वाचा - सामाजिक बांधिलकी जपून डॉ. भारत लाडे यांनी केले अनाथ मुलांना स्वेटरचे वाटप; अनाथांच्या...

पथ्रोट परिसरात पशूप्रेमी म्हणून प्रसिद्ध व पेशाने शिक्षक असलेले रितेश नवले हे मंगळवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे शिंदी रस्त्यावर फिरायला गेले असता त्यांना एक माकड व तिचे लहान पिलू कुत्र्यांच्या तावडीत सापडलेले दिसले. त्यांनी लगेच धाव घेत त्या दोघा मायलेकांना कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले. परंतु, तोपर्यंत कुत्र्यांनी माकडीणला प्रचंड जखमी केले होते. त्यावेळी तेथून जाणाऱ्या सतीश बोरोडे, विवेक पवार, रवींद्र महाजन, अक्षय उपासे, सागर लांडे, ओम विभूते यांना थांबून माकडीणवर उपचार करण्यासाठी रितेश नवले यांनी तत्काळ खासगी डॉक्टरांना आणून तिच्यावर औषधोपचार केला. परंतु, तिचा जीव वाचू शकला नाही.

Advertising
Advertising

हेही वाचा - वयोवृध्द वडिलांचे पालनपोषण न करणाऱ्या दाम्पत्यास न्यायालयाचा दणका; दंडासोबत सुनावली अनोखी शिक्षा 

यादरम्यान तिचे लहान पिल्लू खूप जोरजोराने एकसारखे ओरडत होते व आपल्या मृत आईला घट्ट पकडून होते. अंधार पडल्याने त्यांनी तिला त्याच अवस्थेत उचलून आशीष बोरोडे यांच्या शेतातील झोपडीत ठेवले. तेव्हा पिलासाठी दुधाची व फळांची व्यवस्था करून रात्रीला घरी निघून आले. आज सकाळी पाहिले असता ते पिल्लू आईच्या मृतदेहाला चिकटून बसलेले त्यांना दिसून आले. त्याच्या खाण्यासाठी ठेवलेली फळे व दूध तसेच पडून होते. मग या कार्यकर्त्यांनी मादी माकडावर अंत्यसंस्कार करून तिच्या पिलाला मोकळे सोडले. मात्र, त्या पिल्लाने आईच्या आठवणीत ओरडत होते. दृश्य पाहणाऱ्यांचे मन मात्र यावेळेस पूर्णतः हेलावून गेले होते.