मॉन्सूनपूर्व दाणादाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

नागपूर - सायंकाळी अचानक वादळ, मेघगर्जना व विजेच्या कडकडाटांसह आलेल्या पावसाने नागपूरकरांना चांगलेच झोडपून काढले. जोरदार वादळामुळे अनेक भागांतील रस्त्यांवर झाडे कोसळली, तर शहरातील निम्म्यापेक्षा जास्त भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी अनेक तास अंधारात काढले. हवामान खात्याने हा मॉन्सूनपूर्व पाऊस असून, शहरात ३३.८ मिलिमीटर पाऊस झाल्याचे सांगितले. 

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटांसह वादळ सुरू झाले. त्यानंतर लगेच जोरदार पावसानेही हजेरी लावली. त्यामुळे नागपूरकरांची एकच तारांबळ उडाली. सुमारे पाऊण तास बरसलेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले. 

जोरदार वादळामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर झाडे कोसळल्याने वाहतुकीची कोंडी झाली. लकडगंज, भांडे प्लॉट, मेडिकल चौक, क्रीडा चौक, मानेवाडा रोड, नवीन सुभेदार ले-आउट, कामगार कल्याण मंडळ रघूजीनगर, तपोवन कॉलनी, विमानतळ परिसर, बजाजनगर, उदयनगरासह अनेक भागांत झाडे कोसळल्याची नोंद अग्निशमन विभागाने केल्याचे अधिकाऱ्याने नमूद केले.

उन्ह, सरी अन्‌ सांजगारवा
सायंकाळी पाचच्या सुमारास वातावरण ढगाळ झाले. त्यानंतर अचानक विजांच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी कोसळल्या. काहींनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद लुटला, तर काहींनी त्यापासून बचावाचे प्रयत्न केला. या पावसामुळे सायंकाळी मात्र वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिक सुखावले. 

मेट्रोची क्रेन पडली
अचानक आलेल्या वादळासह पावसाचा फटका मेट्रो रेल्वेच्या कामालाही बसला. वर्धा मार्गावर हॉटेल रेडिसन ब्ल्यूनजीक सुरू असलेल्या कामावरील क्रेनचा भाग दुचाकी व तीनचाकी वाहनावर कोसळला. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. मात्र, वाहनांचे नुकसान झाले. महामेट्रो प्रशासनाला कळताच बचावाचे काम युद्धस्तरावर सुरू करण्यात आले.

पाणीपुरवठ्याची शक्‍यता धूसर
शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही सायंकाळी वादळासह झालेल्या पावसामुळे शहराला पाणी पुरविणारे कन्हान व नवेगाव खैरी येथील पम्पिंग स्टेशन बंद झाले. वादळामुळे पेंच टप्पा चार, गोरेवाडा व कन्हान जलशुद्धीकरणाचा वीजपुरवठाही खंडित झाल्याने उद्या, २७ रोजी शहराला पाणीपुरवठ्याची शक्‍यता धूसर झाली. 

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ग्रामीण भागात जोरदार वादळासह पाऊस आला. त्यामुळे खापा, पारशिवनी व मनसर येथील वीज उपकेंद्रांनी वीजपुरवठा खंडित झाल्याचे नमूद करीत दुरुस्तीची कामे करण्यास वेळ लागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कन्हान व नवेगाव खैरी येथील पम्पिंग स्टेशनला कच्च्या पाण्याचाही पुरवठा होणार नाही. त्यामुळे शहरातील जलशुद्धीकरण केंद्राला कन्हान व नवेगाव खैरीतून पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता नसल्याचे ओसीडब्ल्यू-मनपाने कळविले आहे. परिणामी शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा होणार नसल्याचेही ओसीडब्ल्यूने कळविले आहे. 

वीजपुरवठा सुरू झाल्याचा महावितरणचा दावा
नवेगाव खैरी येथे सावनेर व मनसर उपकेंद्रावरून वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मनसर येथून रात्री ९ वाजता वीजपुरवठा सुरू केला, त्यामुळे नऊनंतर खैरी येथील पम्पिंग स्टेशन सुरू झाल्याचा दावा महावितरणने केला. मनसरवरून दुसऱ्या लाइनचे काम रात्रीपर्यंत सुरू होते.

Web Title: monsoon rain