सीबीएसई आणि एचएससीसाठी शिक्षण तज्ज्ञांची समिती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

नागपूर - अकरावी व बारावीचा अभ्यासक्रम देश पातळीवर समान असावेत, या धोरणानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एचएससी); तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. दोन्ही माध्यमांच्या अभ्यासक्रमाची काठीण्य पातळी तपासणीच्या दृष्टीने शिक्षण तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. दिवाळीपूर्वी ही समिती यासंदर्भात अहवाल सादर करेल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.
सदस्य सुनील प्रभू यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना तावडे म्हणाले, की समितीच्या अहवालावर घेण्यात येणारा निर्णय हा गुणवत्तेच्या आधारावर घेण्यात यईल, कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही तावडे यांनी सांगितले. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळ प्रवेश न मिळता तो अतिशय दूर मिळतो, त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते, तरीही विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश देताना हे प्रवेश विद्यार्थ्यांच्या घराजवळ मिळावेत, यासाठी नेबरहूड स्कूलिंग ही संकल्पना राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. त्यादृष्टीने यासंदर्भात अभ्यास करण्याच्यादृष्टीने एक समिती स्थापन करण्यात येईल, असेही तावडे यांनी या वेळी सांगितले.

वीजबिलाची रक्कम थेट शाळांना
राज्यातील शाळांच्या विद्युतीकरणासाठी शासनाने योजना आखली असून, या योजनेअंतर्गत शाळांना शासकीय दराने वीजपुरवठा करण्यात येणार आहे; तसेच यापुढे शाळांच्या वीजबिलाची रक्कम थेट शाळांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली. सदस्य शशिकांत शिंदे यांनी राज्यातील डिजिटल शाळांपर्यंत वीज पोहोचली नसल्याची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. राज्यातील 7 जिल्हे हे 100 टक्के डिजिटल शाळांचे झाले आहेत. इंग्रजी शाळेत शिकणारे विद्यार्थी आता मराठी शाळेत प्रवेश घेत आहेत. त्याबरोबरच 1 लाख 73 हजार शिक्षक "टेक्‍नोसॅव्ही' झाले असल्याचेही तावडे यांनी या वेळी सांगितले.

Web Title: monsoon session CBSE HSC Education Technic Committee