मराठीच्या नावाने फक्त आश्‍वासनांचा पाऊस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

नागपूर - पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच शासनाने संत विद्यापीठाच्या निर्मितीसाठी तज्ज्ञ समितीच्या स्थापनेची घोषणा केली.

नागपूर - पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच शासनाने संत विद्यापीठाच्या निर्मितीसाठी तज्ज्ञ समितीच्या स्थापनेची घोषणा केली.

मात्र, गेल्या ८४ वर्षांपासून प्रलंबित मराठी विद्यापीठ स्थापनेसाठी सुचवण्यात आलेली समिती तयार करण्यात शासन टाळाटाळ करीत आहे, असा  आरोप करतानाच मराठीच्या नावाने सरकार केवळ आश्‍वासनांचा पाऊस पाडत असल्याचेही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी म्हटले आहे. राज्य सरकारची ही भूमिका संतापजनक असून या अधिवेशनात आश्‍वासनपूर्ती करावी, अशी मागणीही डॉ. जोशी यांनी केली आहे. बडोदा साहित्य संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी साहित्यिकांचे शिष्यमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तसेच याचबाबतीत सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेण्याचे आश्‍वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिले. मात्र, एकाही आश्‍वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही, अशी खंत च्यांनी व्यक्त केली. 

मनपाने बंद केलेल्या ३४ मराठी शाळा पुन्हा सुरू करण्याचे आश्‍वासन सरकारने द्यावे, असे आवाहन डॉ. जोशी यांनी केले आहे. बारावीपर्यंत मराठी भाषा सक्तीचे करणारा ‘मराठी भाषा शिक्षण कायदा’ करणे, मराठी भाषा विकास प्राधिकरण यंत्रणा स्थापन करणे, मराठी भाषा विभागात संचालक पद निर्माण करणे, मराठी भाषा विकासाची तरतूद किमान १०० कोटी करणे या सर्व मागण्यांसाठी १५ मार्चला संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख व मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठी संबंधित सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

Web Title: monsoon session marathi commitment