सुट्यांवर गदा, पोलिसांमध्ये खदखद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

नागपूर - पावसाळी ते हिवाळी अधिवेशनादरम्यान अनेक सण-उत्सव येत असल्याने कडेकोट बंदोबस्तासाठी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्यांवर गदा येणार आहे. ती खदखद पोलिस कर्मचारी सोशल मीडियाचा आधार घेऊन व्यक्त करीत आहेत. किरकोळ, हक्काच्या आणि मेडिकल रजाही यंदा बुडणार असल्याने पारिवारिक आनंदावरही विरजण पडणार असल्याचे बोलले जात आहे.  

नागपूर - पावसाळी ते हिवाळी अधिवेशनादरम्यान अनेक सण-उत्सव येत असल्याने कडेकोट बंदोबस्तासाठी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्यांवर गदा येणार आहे. ती खदखद पोलिस कर्मचारी सोशल मीडियाचा आधार घेऊन व्यक्त करीत आहेत. किरकोळ, हक्काच्या आणि मेडिकल रजाही यंदा बुडणार असल्याने पारिवारिक आनंदावरही विरजण पडणार असल्याचे बोलले जात आहे.  

उपराजधानीत पावसाळी अधिवेशनासाठी राज्यभरातून पोलिस बंदोबस्तासाठी आले आहेत. या पोलिसांना जवळपास महिनाभर बंदोबस्तासाठी शहरात राहावे लागणार आहे. त्यानंतर लगेच स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘रेड अलर्ट’ तसेच परेड, रॅली, बंदोबस्त आणि शासकीय कार्यक्रमांसाठी पोलिस सज्ज राहावे लागणार आहे. यातून उसंत मिळते न तोच २२ ऑगस्टला बकरी ईदसाठी बंदोबस्त करावा लागणार आहे. ९ सप्टेंबरला पोळा, १३ सप्टेंबरला गणेशोत्सव आणि लगेच  १० ऑक्‍टोबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सलग महिनाभर पुन्हा  पोलिस बंदोबस्तासाठी सज्ज असणार आहेत. १८ ऑक्‍टोबरला दसरा आणि दीक्षाभूमीवर येणाऱ्या धम्म बांधवांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त तर ७ नोव्हेंबरपासून दिवाळीच्या बंदोबस्तासाठी सज्ज राहावे लागणार आहे. २० नोव्हेंबरला ईद-ए-मिलादसाठी बंदोबस्त असेल. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पुन्हा हिवाळी अधिवेशनाचा बंदोबस्ताची जबाबदारी पोलिसांच्या डोक्‍यावर असणार आहे. त्यामुळे पोलिसांना मिळणाऱ्या सुट्या निश्‍चितच बुडणार आहेत. वरिष्ठांकडे सुट्यासाठी अर्ज केल्यास बंदोबस्ताच्या नावाखाली सुटी मंजूर होत नसल्याने हक्‍काच्या रजाही बुडतात.

कुटुंबीयांमध्ये नाराजी
सतत पोलिस बंदोबस्तात असलेला मुलगा, पती, वडील, आई, पत्नी आणि भाऊ एकाही सणाला किंवा लग्नप्रसंगी उपस्थित राहू शकत नाही. त्यातही हक्‍काच्या रजाही मिळत नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

पोलिसांच्या सुट्या
१२- किरकोळ रजा (सीएल)
४५- अर्जित रजा (हक्‍क रजा)
२०- वैद्यकीय रजा (अर्धपगारी रजा)
०१ - ब्लड डोनेट रजा

आगामी बंदोबस्ताचे दिवस
१५ ऑगस्ट - स्वातंत्र्यदिन
२२ ऑगस्ट- बकरी ईद 
९ सप्टेंबर- पोळा
१३ सप्टेंबर - गणेश उत्सव
१० ऑक्‍टोबर- नवरात्र सुरुवात 
१८ ऑक्‍टोबर- दसरा
७ नोव्हेंबर- दिवाळी
२० नोंव्हेबर- ईद-ए -मिलाद
डिसेंबर - हिवाळी अधिवेशन

Web Title: monsoon session state Police holiday