आता विधिमंडळ परिसरात उंच रॅम्प

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 जुलै 2018

नागपूर - महाराष्ट्र विधिमंडळाचे नागपुरात सुरू असलेले पावसाळी अधिवेशन अतिवृष्टीमुळे चांगलेच गाजू लागले आहे, शुक्रवारी मुसळधार पावसामुळे विधिमंडळाचे कामकाज थांबवावे लागल्याने राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली होती. आता राज्य सरकारने विधानभवन परिसरात उंच रॅम्प उभारण्याच्या कामाला सुरवात केली आहे.

पावसामुळे पुन्हा विधिमंडळाचे कामकाज थांबविण्याची पाळी येऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी आता रात्रंदिवस काम करीत आहेत.

गुरुवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारीही आपला जोर कायम ठेवला होता, नागपुरात एकाच दिवसात 350 मि.मी. पाऊस कोसळल्याने अवघे शहर जलमय झाले होते. विधानभवनातही पाणी साचल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता; तसेच परिसरातही जवळपास 1 फूट पाणी साचल्याने आमदार, मंत्र्यांना ये-जा करणेही कठीण झाले होते. या घटनेनंतर युद्धपातळीवर विधानभवनातील सोईकडे लक्ष पुरविल्या जात आहे. विधानभवन आवारात यापूर्वीच शामियाना उभारण्यात आला आहे. आता यात जवळपास एक ते दीड फूट उंच लाकडी रॅम्प उभारण्यात येत असल्यामुळे पाणी साचले तरी आमदारांना विधानभवनात जाण्यास कोणतीही अडचणी येणार नाही.

संरक्षक भिंत
विधानभवनातील पॉवर हाउस पाण्यात बुडाल्याने विद्युत पुरवठा खंडित करावा लागला होता. आता पॉवर हाउसमधील यंत्रणेचे संरक्षण करण्यासाठी या पॉवर हाउसच्या बाहेर संरक्षक भिंत उभी करण्यात आली आहे. भाजप-शिवसेना इतर पक्षांच्या कार्यालयातही पाणी साचले होते. केवळ कॉंग्रेस पक्षाचे विधिमंडळ कार्यालय वरच्या मजल्यावर आहे. त्या ठिकाणी पाणी साचू शकले नाही. हा प्रसंग पुन्हा उद्‌भवू नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वतोपरी खबरदारी घ्यायला सुरवात केली आहे.

Web Title: monsoon session Vidhimandal high ramp