मॉन्सून आठ जूनपर्यंत विदर्भात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

मॉन्सूनचे अपेक्षित आगमन 
केरळमध्ये : 29 मेपर्यंत 
राज्यात : 5 जूनपर्यंत 
विदर्भात : 8 जूनपर्यंत 

नागपूर - भारतीय हवामान विभागाने नैर्ऋत्य मोसमी पाऊस अर्थात मॉन्सून येत्या 29 मेपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्‍यता वर्तविली आहे. मॉन्सूनचा पुढील प्रवास योग्य दिशेने कायम राहिल्यास राज्यात 5 जूनपर्यंत, तर विदर्भात 8 जूनपर्यंत मॉन्सून धडकण्याची दाट शक्‍यता आहे. हवामान विभागाने वर्तविलेली शक्‍यता विदर्भातील शेतकऱ्यांसाठी निश्‍चितच आनंदाची बातमी आहे. 

भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात 23 मेच्या आसपास मोसमी पावसाचा प्रवेश अपेक्षित आहे. पर्जन्यविषयक हालचाली समाधानकारक राहिल्यास मॉन्सून 29 मे रोजी केरळच्या किनारपट्‌टीवर दाखल होऊ शकतो. केरळमधून मॉन्सूनचा प्रवास कर्नाटकमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने होतो. राज्यात पाच जूनच्या आसपास मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर विदर्भात यायला आणखी तीन ते चार दिवस लागतील. त्यामुळे 8 ते 10 जूनदरम्यान मॉन्सून विदर्भात दाखल होण्याची दाट शक्‍यता आहे. सद्यस्थितीत अंदमानमध्ये बऱ्यापैकी पाऊस सुरू असल्याने, हे मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हे चांगले संकेत मानले जात आहे. 

गेल्या दशकातील एकूण चित्र बघितल्यास विदर्भात मॉन्सूनचे आगमन 10 ते 15 जून या काळात होत असते. वरुणराजा यावेळी लवकर एंट्री करून ही परंपरा मोडीत काढेल, अशी अपेक्षा आहे. हवामान विभागाने यावर्षी दमदार पावसाची यापूर्वीच शक्‍यता वर्तविली आहे. त्यामुळे बळीराजाही जोमाने शेतीच्या कामाला लागला आहे. 

मॉन्सून विदर्भात नेमका कोणत्या तारखेला येईल, हे आतापासून सांगता येणे शक्‍य नाही. मात्र, आधी वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे मॉन्सून 29 मे रोजी केरळमध्ये दाखल झाल्यास साधारणपणे दहा ते बारा दिवसांनी विदर्भात येणे अपेक्षित आहे. पण, त्याचवेळी मॉन्सूनची प्रगती योग्य दिशेने असणे आवश्‍यक आहे. त्यात अडथळा आल्यास आगमन लांबणीवरदेखील पडू शकते. 
-अविनाश ताठे (संचालक, प्रादेशिक हवामान विभाग) 

Web Title: monsoon till 8th June in Vidarbha